मुंबई : निकालात महायुतीच्या पारड्यात अधिक जागा मिळताना दिसत आहेत. यावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. "हा निकाल आम्हाला मान्य नाही. मोदी- शाह आणि भाजपाबद्दल जनतेच्या मनात राग असताना, महायुतीला एवढ्या जागा कशा मिळू शकतात?" असा संतप्त सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
फडणवीस, मोदी- शाह आणि शिंदेंनी दिवे लावलेत? : "लोकशाहीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करू, पण हा जनतेचा निकाल असूच शकत नाही. हार, जीत होत असते, पण हे लावून घेतलेले निकाल आहेत. मी यावर विश्वास ठेवत नाही. हा लाडकी बहीण योजनेचा विजय नाही. लाडके दादा, लाडके आजोबा नाहीत का? अदानींचं राज्यावर बारीक लक्ष होतं, कारण त्यांच्या पैशाच्या रूपातून ही सारी ताकद लावली होती. एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार कसे निवडून येतील? त्यांच्याविरोधात जो रोष होता तो कुठे गेला?" अशी टीका संजय राऊत यांनी भाजपा आणि महायुतीवर केली.
लोकसभेचा निकालही मान्य नव्हता : "लोकसभेचा निकालही आम्ही मानलेला नाही. तिथंही काही जागा भाजपा-युतीनं चोरल्यात. हा लावून घेतलेला निकाल आहे. इतक्या मोठ्या गद्दारीनंतरही आम्हाला 75 जागा येऊ नयेत?, हे शक्यच नाही. चंद्रकांत दादांना म्हणावं तुमच्या मनापेक्षा तुमचं कारस्थान मोठं आहे. अदानी यांनी महाराष्ट्र, मुंबई विकायला काढलीय, म्हणूनच हा निकाल लावून घेतलाय. काही ठिकाणी आमचे उमेदवार जिंकलेत, कारण तिथं ते भक्कम होते. लोकांना शंका येईल म्हणून त्यांना तिथे काही करता आले नाही. शिंदेंना इतक्या जागा येणं शक्य नव्हतं. त्यांनी सारी यंत्रणाच ताब्यात घेतलीय, त्यामुळे हा महाराष्ट्राचा कौल असेल असं मला मान्य नाही. आता पुढे काय करायचे ते ठरवू," असं राऊत म्हणाले.
हा जनतेचा कौल नाही : "महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतला आहे. असे निकाल महाराष्ट्रात कधीच लागू शकत नाहीत. मात्र, हे निकाल भाजपानं लावून घेतले आहेत. हा जनतेचा कौल नाही. हा अदानी आणि त्यांच्या टोळीनं लावून घेतलेला निकाल आहे," असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी निकालावरुन भाजपावर टीका केली.
भाजपावर केली टीका : "भाजपानं यंत्रणा हातात घेतली आहे. मराठी माणूस आणि जनतेचा हा कौल नाही. आलेल्या निकालावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. दोन दिवसांपूर्वी अदानींबाबत वॉरंट निघालं होतं. यात भाजपाची पोल खोलली आहे. मोदी, शाह, फडणवीस, शिंदे हे एक आहेत. अदानी प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हे केलेलं कारस्थान आहे," असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.
हेही वाचा -