पुणे Praful Patel : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान मोदींचा छत्रपती शिवाजी महाराज जसा जिरेटोप घालत होते तसा जिरेटोप देऊन सत्कार केला. यावर विरोधकांसह शिवप्रेमी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता प्रफुल पटेल यांनी ट्विट करत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर आणि लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढं काळजी घेऊ, अस म्हटलंय. पण आता यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक होत प्रफुल पटेल यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिलाय.
संभाजी ब्रिगेडचा प्रफुल पटेलांना इशारा : यावेळी संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे म्हणाले, "प्रफुल पटेल तुम्ही चूक केलीय. महाराष्ट्राची माफी मागायची सोडून यापुढं चूक करणार नाही असा शब्दांचा खेळ करु नका. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे या हेतूनं तुम्ही सरकारकडं लांगूनचालन करत आहात. प्रफुल पटेलांनी ट्विट करुन दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. ही सत्तेची नशा संभाजी ब्रिगेड उतरवल्याशिवाय राहणार नाही." तसंच प्रफुल पटेलांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तमाम शिवप्रेमींसोबत आंदोलन करेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
विरोधकांकडून पंतप्रधानांवर टीकास्त्र : यासंदर्भात बोलताना शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी हे नेहमीच महाराष्ट्राचा अपमान करत आले आहेत. छत्रपती शिवरायांचा जिरेटोप परिधान करुन त्यांनी पुन्हा एकदा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केलाय, या शब्दांत त्यांच्यावर टीका केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. पण या दैवताचा सातत्यानं अपमान केला जातोय. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भापजा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला. पण भारतीय जनता पक्षानं त्यावर चकार शब्द काढला नाही, असं म्हणत भाजपाला धारेवर धरलंय.
हेही वाचा :