मुंबई/चंद्रपूर : चांदिवली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार आरिफ नसीम खान यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट मुंबईत आले होते. या प्रचारसभेत बोलत असताना सचिन पायलट यांनी महायुती सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले सचिन पायलट? : यावेळी बोलत असताना सचिन पायलट म्हणाले की, "राज्यात नकारात्मक वातावरण पसरवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार भाजपा आणखी किती काळ करणार आहे? 'बटेंगे तो कटेंगे' असा दुष्प्रचार आणखी किती काळ सुरू राहणार? याऐवजी 'पढोगे तो बढोगे' हा आपला नारा आहे", असं पायलट म्हणाले. तसंच राज्यात मविआला अनुकूल वातावरण असून मविआ सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "मविआ सत्तेत आल्यावर नसीम खान यांच्यावर मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल. त्यामुळं खान यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा," असं आवाहनही पायलट यांनी यावेळी केलं.
महायुती सरकारला घरचा आहेर दाखवा : सचिन पायलट यांची बुधवारी (13 नोव्हेंबर) चंद्रपूरमधील भद्रावती शहरात महाविकास आघाडीचे भद्रावती-वरोरा क्षेत्रातील उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. यावेळी महायुतीवर हल्लाबोल करत पायलट म्हणाले,"केंद्रातील भाजपा आणि राज्यातील महायुतीच्या काळात राज्यात विकासकामांना खीळ बसली आहे. जनता वाढत्या महागाईनं त्रस्त आहे. बेरोजगारीच्या खाईत राज्याला लोटलं जातंय. देशात आणि राज्यात शून्य विकासकामं आहेत. या समस्या आणि विकासकामांना बगल देण्यासाठीच महायुती धर्माचं आणि जातीपातीचं राजकारण करुन जनतेचं लक्ष भटकवण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप त्यांनी केला. तसंच येत्या निवडणुकीत महायुती सरकारला घरचा आहेर दाखवा. गोरगरिबांच्या कल्याणासाठी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ द्या, असं आवाहनही सचिन पायलट यांनी यावेळी केलं.
हेही वाचा -