कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला प्रति टन एकरकमी 3 हजार 700 रुपये दर मिळावा, तसंच गतवर्षीच्या ऊसाला दिवाळीपूर्वी 200 रुपये दुसरा हप्ता मिळावा, अन्यथा वीस दिवसानंतर साखर कारखानदारांना आंदोलनाच्या माध्यमातून सळो की पळो करून सोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जयसिंगपूर येथे आयोजित 23 व्या ऊस परिषदेला संबोधित करताना राजू शेट्टी बोलत होते. बळीराजाचा आवाज विधानसभेत पोहोचण्यासाठी छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला असणाराच प्रतिनिधी निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणाही शेट्टी यांनी यावेळी केली.
आंदोलन छेडण्याचा इशारा : कोल्हापुरातील जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 23 व्या ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला राज्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 200 रुपयांचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा, यासह एकूण नऊ ठराव मांडण्यात आले. या ठरावांना राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी हात उंचावून मान्यता दिली. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं वीस दिवसानंतर साखर कारखानदारांनी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय.
स्वाभिमानीचे शिलेदार उतरणार विधानसभेच्या मैदानात : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्मभूमी असलेल्या शिरोळ विधानसभा मतदारसंघातून सावकार मादनाईक विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या हातकणंगले विधानसभेतून वैभव कांबळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. मात्र, शुक्रवारी झालेल्या ऊस परिषदेत विधानसभेबाबत कोणताही निर्णय झाला नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी याबाबत एकमतानं निर्णय घेतील. मात्र, शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानीचे शिलेदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत. याबाबतची माहिती राजू शेट्टी यांनी याआधीच दिली होती.
हेही वाचा
- महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं; 'या' पक्षानं दिला स्वबळावर लढण्याचा इशारा
- "6 तास थांबून फक्त 40 सेकंद भेट, आजपासून शिवसेनेचं काम करणार", इच्छुक उमेदवाराची आक्रमक भूमिका
- विधानसभेसाठी मनसेची चौथी यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
- EXCLUSIVE : "देवेंद्र फडणवीस यांच्या जनसेवेची 25 वर्ष पूर्ण", पत्नी अमृता आणि लेक दिविजा काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ