पुणे Rahul Gandhi Rally : देशात कॉंग्रेसची सत्ता आल्यावर आरक्षणाची 50 टक्के मर्यादा आम्ही उठवू, ज्यामुळं मराठा आणि धनगरांना आरक्षणात वाटा मिळेल, असं आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी निवडणुक राेख्यांच्या माध्यमातून देशासमाेरच भ्रष्टाचार केलाय. असा आरोप देखील यावेळी राहुल गांधी यांनी केला. पुणे लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयाेजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर जोरदार टीका करत इंडीया आघाडीच्या जाहीरनाम्यातील तरतुदी सांगितल्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह माहाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
भाजपाला आव्हान : यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "ही निवडणुक राज्यघटना तसंच लाेकशाही वाचविण्याची लढाई आहे. राज्यघटनेनं गरीब, दलित, आदीवासी, अल्पसंख्याक यांना जे अधिकार दिले आहेत. ते भाजपाला काढून घ्यायचे आहे. तसं झाले तर वीस-बावीस जणांच्या हातात सगळं जाऊ शकतं. या देशाची ओळख हे संपवणार आहेत, पण आपण ते हाेऊ देणार नाही. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत जे महत्वाचे प्रशासकीय अधिकारी आणि न्यायव्यवस्थेमधील न्यायाधीशांची संख्या लक्षात घेतली तर यात दलित, आदीवासी, मागासवर्गीय यांची संख्या अत्यल्प आहे. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातही उच्च पदस्थ अधिकारी म्हणून हे वर्ग दिसत नाहीत. भाजपाचे नेते कधी राज्यघटना बदलण्याची, तर कधी पन्नास टक्के आरक्षण काढून टाकण्याची भाषा करत आहेत. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी हे आरक्षण काढून दाखवावं. आमची सत्ता आली तर आम्ही आरक्षणाची असलेली पन्नास टक्क्याची मर्यादा काढून टाकणार आहोत."
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु : ते पुढे म्हणाले की, "भाजपाचे सरकार हे अदानीसह बावीस लाेकांसाठीच काम करीत आहे. मोदीजी यांनी या लोकांचे सुमारे साेळा लाख काेटी रुपयांचं कर्ज माफ केले. या पैशातून शेतकऱ्यांचे पुढील चाेवीस वर्षाचं कर्ज माफ करता आलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार आहोत. तसंच शेतमालाला हमीभाव देखील देणार आहोत. एवढंच नव्हे तर यासाठी आयोग तयार करुन आयोगाच्या म्हणण्यानुसार लगेच आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत."
मोदींवर घणाघात : पंतप्रधान नरेंद्र माेदींनी राजकारण चेष्टेचा विषय केलाय. कर्नाटकात चारशे महीलांवर बलात्कार करणाऱ्या रेवण्णासाठी पंतप्रधान माेदी मतं मागत आहेत. त्याच्या प्रचाराला जात आहेत. तसंच दुसरीकडं पवारांसारख्या व्यक्तींचा अपमान केला जाताेय. मोदी हे समुद्राखाली जाऊन बसण्याची नाटकं करत असून देशाच्या विषयांवर बाेलत नाही. ते शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ्य नेत्यांविषयी विधानं करुन त्यांचा अपमान करत आहे. या टिकेमुळं पंतप्रधान पदाची गरीमा राखली जात नाही, अशी टीका यावेळी राहुल गांधींनी मोदींवर केलीय.
हेही वाचा :