अमरावती : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीमुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. तर दुसरीकडं निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच नेते, विविध पक्षांचे प्रमुख स्टार प्रचारक राज्यभर फिरत आहेत. एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात त्वरित पोहोचण्यासाठी हे नेते हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात पैशांसह कुठल्याही वस्तूंची ने-आण केली जाऊ शकते. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बॅग तपासणी सुरू केली.
हेलिकॉप्टरची केली तपासणी : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाहीर सभेसाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे हेलिकॉप्टरने आले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीनं तैनात अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टर तपासणी संदर्भात यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला.
मोदी आणि शाहांची तपासणी व्हावी : "निवडणूक आयोग हे खरंतर निष्पक्ष असावं. ज्याप्रमाणं उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी केली जात आहे, त्याप्रमाणेच मोदी आणि शाहांच्या बॅगची तपासणी देखील व्हायला हवी. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅगा देखील तपासल्या जाव्यात," असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
ते खोके घेऊन गेलेत त्यांना तपासा : "खरंतर खोके घेऊन ते गेले होते, आम्ही आहे तिथेच आहोत. त्यामुळं खोके घेऊन जाणाऱ्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी व्हायला हवी. निवडणूक आयोग दुजाभाव करत आहे. लोकसभेतही निवडणूक आयोगानं दबाव तंत्राचा वापर केला आणि आता देखील विधानसभा निवडणुकीत अतिशय दुजाभाव करत आहे. लोकशाहीत एका पक्षाला एक न्याय आणि सत्तेत असणाऱ्यांना दुसरा न्याय असं चालत नाही. बोलायचं तर बरच काही आहे पण बोलणार नाही. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार," असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त करत महायुतीला टोला मारला
हेही वाचा -