शिर्डी Radhakrishna Vikhe Patil On Congress : महायुतीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज (5 एप्रिल) महायुतीचा मेळावा अकोले येथे पार पडला. या मेळाव्याला महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, खा.सदाशिव लोखंडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, शिवसेनेचे कमलाकर कोते, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन मांढरे आदी उपस्थित होते.
विखे पाटलांचा कॉंग्रेसवर निशाणा : यावेळी बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष करताय. मात्र, इंडीया आघाडी केजरीवाल यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व्यक्तीचं समर्थन करत आहे. या आघाडीकडं कोणतंही नेतृत्व आणि अजेंडा नाही. राज्यातील महाविकास आघाडीची देखील फार काही वेगळी परिस्थिती नाही. केवळ व्यक्तीद्वेषापोटी पंतप्रधानांवर टीका करायची, संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याचा आरडा ओराडा करायचा. पण असा आरोप करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं आहे."
महिलांचा सन्मान हेच मोदी सरकारचं धोरण : पुढं ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहेत. या देशाला समर्थ आणि विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी मोदीजींचे अवितर कष्ट सुरु आहेत. लोककल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात मिळत असल्यानं मागील दहा वर्षात केंद्र सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप होवू शकला नाही. महिलांचा सन्मान हेच मोदी सरकारचं धोरण असून, नारी शक्तीला बळ देण्याचं काम केंद्र सरकारकडून होत आहे. मोफत धान्य योजनेपासून ते आयुष्यमान भारत योजनेपर्यंतचा लाभ देशातील कोट्यावधी लोकांना होत आहे", असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -