पुणे Prakash Ambedkar Appeal : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही चर्चा पूर्ण न झाल्यानं वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेली नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. महाविकास आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठका आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय.
वंचितची 27 जागांची मागणी : महाविकास आघाडीतल्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीनं 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचं पत्र दिलं होतं. मात्र, वंचितची जागांची मागणी पाहता तिन्ही पक्षांचं गणित बिघडू शकतं. त्यामुळं मविआच्या नेत्यांकडून अद्यापही जागावाटपाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या व्हिडिओत कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हटलंय, "वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. त्यामुळं इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी आणि कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये."
सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी : दोन दिवसांपूर्वी नागपुरात प्रकाश आंबेडकरांनी आम्ही स्वतंत्रपणे लढलो तरी लोकसभेला किमान 6 जागा जिंकू शकतो, असं म्हटलं होतं. तसंच महाविकास आघाडीनं आम्हाला चर्चेला बोलावलं नसतं आणि आम्ही स्वबळावर लढलो असतो तर आम्ही किमान 6 जागा जिंकलोच असतो, असा दावाही केला होता. आम्ही पत्र देतानाच 48 उमेदवारांची तयारी केल्याचं सांगितलं होतं. आम्ही त्यामध्ये मतदारसंघही नमूद केले आहेत. या मतदारसंघांमध्ये आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करुन तयारी केल्याचा दावादेखील प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
हेही वाचा :