मुंबई : "मुंबईकर बंधू आणि भगिनींनो माझा नमस्कार. मी सिद्धिविनायक, मुंबा देवी आणि महालक्ष्मी मातेला प्रणाम करतो," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सभेची सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीसाठीची मोदी यांची राज्यातील ही शेवटची सभा होती. या सभेतून मोदींनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. जातीय वाद, कलम 370, काश्मीर संविधान, वीर सावरकरांचा अपमान, महायुतीच्या योजना अशा विविध मुद्द्यांना मोदींनी स्पर्श केला. तसंच महायुतीच्या शपथविधी सौहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी मी आल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
राम मंदिर, 370 कलमला विरोध केला : "महाराष्ट्रात या निवडणुकीसाठी माझी शेवटची सभा आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोंकणात मी दौरा केला आणि आता मुंबईत सभा घेतली. संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा महायुतीला आहे. महायुती आहे तर गती आहे. येथील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी देशाला दिशा दिली. आज एकीकडे महायुतीची विचारधारा महाराष्ट्राच्या गौरवाची आहे, तर दुसरीकडं एक विचार महाआघाडीचा आहे, जो महाराष्ट्राच्या गौरव प्रतिमेला बदनाम करत आहे. राम मंदिराला विरोध, मतासाठी भगवा दहशतवाद, काश्मीरमध्ये ३७० कलम परत आणण्यासाठी प्रस्ताव देणारे हेच विरोधक आहेत," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा आघाडीला त्रास होतो. हेच लोक आहेत ज्यांनी कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही. आता आम्ही दिल्यावर यांना दुःख होतंय. तुम्ही यांच्यापासून सावध राहा," असा सावधानतेचा इशाराही मोदींनी दिला.
महायुतीच्या कामांचा वाचला पाढा : "मुंबई स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती त्या स्वप्नांना साकार करणारी आहे. आम्ही स्टार्ट अप अभियान सुरू केलं. मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्ट अप येत आहेत. महाराष्ट्रात २६ हजार स्टार्ट अप आले असून, ज्यात महिलांची संख्या अधिक आहे. महिलांच्या सशक्तीकरणाला गती आली. कमी व्याज दरात घरासाठी कर्ज दिलं. ७० लाख लोकांना पीएम योजने अंतर्गत व्यवसाय चालू करता आला. सेवा भावनेने काम फक्त महायुती करू शकते," असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
'एक है तो सेफ है' चा नारा : "तुमची स्वप्न हाच आमचा संकल्प आहे. मोदी त्यासाठी जगतो, जागतो आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाची गॅरंटी देतो. मुंबईसाठी हेच स्वप्न महायुतीनं बघितलंय. मुंबईत सर्व दिशांना वेगानं कामं सुरू आहेत. केंद्रात कित्येक दशक काँग्रसचं सरकार होतं. परंतु त्यांनी मुंबईसाठी काहीच केलं नाही. मुंबईकरांचा मिजाज म्हणजे इमानदारी आणि पुढे जाण्याची शक्ती आहे. परंतु काँगेसचा मिजाज म्हणजे मागे जाणे, विकासापासून दूर जाणे हा आहे. आम्ही जोडण्यावर विश्वास ठेवतो तर आघाडी तोडण्यावर विश्वास ठेवते. महाविकास आघाडी सर्व जातींना एकमेकांविषयी लढवत आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेस काम करत आहे, अशा परिस्थितीमध्ये 'एक है तो सेफ है' गरजेचं आहे," असा नारा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी दिला.
पाताळातसुद्धा सोडणार नाही : "मुंबई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वाभिमानाचं शहर आहे. पण एक पक्ष असा आहे ज्याने त्यांचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हातात दिला. एकदा राहुल गांधी यांच्या तोंडून बोलून घ्या, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.. बघा तुम्हाला चांगली झोप लागेल. या अगोदर काँग्रेस सरकार होती तेव्हा मुंबईसह अनेक ठिकाणी अप्रिय घटना घडल्या. तुम्हाला बस, ट्रेनमध्ये बसायला पण भीती वाटायची. आज मोदी आहे. त्यांना माहीत आहे की, त्यांनी मुंबई, भारताविरोधात काही केलं तर मोदी त्यांना पाताळातसुद्धा सोडणार नाही," असा इशारा मोदींनी विरोधकांना दिला.
शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आलो : "मुंबईकर आपली जबाबदारी पूर्णपणे बजावतात म्हणून २० तारखेची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. तुम्हाला महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणायचं आहे आणि नवीन शपथविधीची तयारीसुद्धा करायची आहे. मी तुम्हाला १० दिवस अगोदर शपथविधी कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील विजय हा हरियाणा पेक्षा मोठा असेल," असं म्हणत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसनं गरिबांना गरीब ठेवण्याच्या अजेंडयावर काम केलं : नवी मुंबईतील सभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, "गरीबी हटाव या नाऱ्याच्या नावाखाली काँग्रेसनं गरिबांना लुटलं आहे. त्यामुळं स्वातंत्र्याला 75 वर्ष लोटूनही गरिबांना त्यांच्या आयुष्यातील अडचणींमधून बाहेर येता आलं नाही. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांसाठी जनता झगडत राहिली. मात्र, गेल्या दहा वर्षात परिस्थिती पहिल्यांदा बदलली आहे. सरकारनं तब्बल 25 कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर आणलं आहे. आमच्या माध्यमातून चार कोटी बेघर लोकांना पक्क्या घरांचं सुख आणि सुरक्षा दिली. तसेच बारा कोटी लोकांच्या घरात स्वच्छतागृह बनवून त्यांना आत्मसन्मानानं जगण्याचा अधिकार दिला."
हेही वाचा -
- मराठवाड्यात विकासाची गंगा आणणार, काश्मीरमध्ये वेगळं संविधान आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- विद्यमान आमदाराची उद्धव अन् राज ठाकरेंबरोबर गद्दारी, नसीम खान यांचा दिलीप लांडेंवर हल्लाबोल
- महायुती पुन्हा सत्तेत आल्यास वर्षभरात मुंबई-गोवा महामार्ग तयार होणार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं विधान