मुंबई PM Modi Maharashtra visit - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11.45 वाजता माढा येथील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी तर माळशिरस इथे सभा घेणार आहेत. तर दुपारी 1.30 वाजता महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये (पूर्वीचे उस्मानाबाद) घेणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता पंतप्रधान मोदी लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
"महाराष्ट्रात काही भटकती आत्मा आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत," अशी पंतप्रधान मोदींनी नाव न घेता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभेतून बोलताना सोमवारी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील म्हणाले, " महाराष्ट्राचा 'आत्मा' म्हणून पवारांकडे पाहिलं जाते. ४ जूनला मोदींना कळेल. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न उपस्थित केले. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, "संपूर्ण भाजपानं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं, 'मोदींनी शरद पवार साहेब यांना भटकती आत्मा म्हणणे', हे पटते का, याचे स्पष्टीकरण द्यावे , खासकरून अजित पवार यांनी ! मराठी माणसे "भटकता आत्मा" कशाला म्हणतात, हे मतदानात दाखवून देतील.
पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पाहात नाहीत ना? जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " आदरणीय शरद पवारसाहेब यांना 'भटकती आत्मा' असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जिवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमकं मोदींना म्हणायचे तरी काय होते? बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते. त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,"यांचे शेवटचे भाषण कधी होणार, हेच कळत नाही." मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पाहात नाहीत ना? पवारसाहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय?
महाराष्ट्रात वेगळं राजकारण घडणार- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील सभेत मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीत लोकशाही पद्धती टिकेल याकडे पहिल्यांदा लक्ष घालावे लागते. दोन-दोन वर्षे निवडणुकाच होत नाही. लोकांना निर्णय घ्यायचा अधिकारच त्यांना गाजवता येत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे हळूहळू आपण वेगळ्या रस्त्याला जायला लागलोय. आज जिल्हा, तालुकापातळीच्या निवडणुका थांबल्या, आणखी काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबतील. त्याचा परिणाम संविधानावर होईल. महाराष्ट्रात वेगळ राजकारण घडणार आहे, हे पंतप्रधान मोदींच्या लक्षात आलय. त्यामुळे ते दोन दिवस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात जाणार आहेत. काहीतरी वेगळ सांगून लोकांच्या मनात नसलेल्या गोष्टी आणून देशाचा कारभार आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय गत्यंतर नाही या निष्कर्षाशी ते आले आहेत.
उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान- नकली शिवसेना एका वर्षात चार पंतप्रधान करणार अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर पंतप्रधान मोदींनी धाराशिव येथील सभेत तुळजाभवानीचा उल्लेख करावा, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. जर तुळजाभवानीचा उल्लेख केला तर निवडणूक आयोग कारवाई करणार का, असा प्रश्नही त्यांनी सोलापूरमधील सभेत सोमवारी उपस्थित केला. शिवसेना ठाकरे गटाच्या एका व्हिडिओमध्ये 'जय भवानी' अशी घोषणा असल्यानं निवडणूक आयोगानं नोटीस बजाविली आहे.
शाह आणि फडणवीस यांच्यावर शरद पवारांची टीका- पंतप्रधान मोदी आणि त्यांचे जोडीदार अमित शाह महाराष्ट्रातील भाषणात विचारलं की शरद पवार यांनी काय केलं? ते राज्याराज्यांत जाऊन लोकांसमोर आपण काय दिवे लावले हे सांगत नाहीत. दुसऱ्याने काय केलं हाच प्रश्न विचारतात. मोदींनी देशातील महागाई कमी करण्याची नाही, तर महागाई वाढवण्याची धोरणे आखली आहेत. जो महागाई वाढवतो, त्याला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल. काही उभं करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, अशी टीका शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. या देशाचे सबंध राजकारण उद्धवस्त करण्याची भूमिका तुम्ही घेतली. हे लोकांना पसंत नसल्याचंही राष्ट्रवादीच्या संस्थापकांनी सांगितलं.
हेही वाचा-