अमरावती : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीच्या विरोधात असणाऱ्या 'परिवर्तन महाशक्ती'चे (तिसरी आघाडी) अमरावती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सैय्यद अबरार यांनी चक्क काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांना जाहीर पाठिंबा घोषित केला. सैय्यद अबरार यांच्या या निर्णयामुळं 'परिवर्तन जनशक्ती'मधील आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मोठा हादरा बसला.
अबरार यांच्या निर्णयाचा प्रहारलाही पडला प्रश्न : अमरावती शहरातील पश्चिम भागात मोठ्या संख्येनं वसलेल्या मुस्लिम बांधवांना न्याय मिळावा, या उद्देशानं बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं मुस्लिम व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. एकूण 8 जणांनी उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली. या 8 पैकी सय्यद अबरार हे अतिशय चांगले व्यक्ती असल्यामुळं बच्चू कडू यांनी त्यांना उमेदवारी दिली. असं असताना सय्यद अबरार यांनी अचानक काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. "याबाबत आम्हाला सुद्धा मोठा प्रश्न पडलाय," असं प्रहारचे प्रदेश प्रवक्ता जितू दुधाने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
अमरावतीत बच्चू कडू जाहीर करणार भूमिका : "प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे आज मेळघाटात प्रचारासाठी असल्यामुळं अमरावतीत येऊ शकले नाहीत. मात्र, उद्या किंवा परवा बच्चू कडू हे अमरावतीत विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाची पुढची भूमिका काय असेल याबाबत निर्णय जाहीर करणार," असं जितू दुधाने यांनी सांगितलं.
जीविताला भीती असल्याची दिली होती तक्रार : सय्यद अबरार यांनी आपल्या जीविताला धोका असल्यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडं तक्रार दिली होती. आज त्यांना पोलिसांकडून विशेष सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार होता. मात्र, अबरार यांनी तक्रार मागं घेत, सकाळीच काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला, असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
हेही वाचा