सातारा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय. तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदार संघात बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत. राज्यात ऊन्हाचा पारा वाढत असताना आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही तापलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
वक्तव्यावर केली सारवासारव : साताऱ्यातील दहिवडी (ता. माण) येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले की, "पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती आहे. कोण कुणाशी कधी लग्न करतं, कोण कुणाशी कधी घटस्फोट घेतं, कोण कुठल्या पार्टीत येतं आणि कोण कुठल्या पार्टीत जातं, हेच समजत नाही." विद्यमान परिस्थितीबद्दल बोलत असल्याचं नितीन गडकरींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला सावरले आणि मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो, त्यावेळची पण अशीच परिस्थिती होती, असं सांगत आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, गडकरींचं वक्तव्य हे महाराष्ट्रातील विद्यमान घडामोडींवरच होतं, हे उपस्थितांच्या चांगलंच लक्षात आलंय.
गडकरींनी केली काँग्रेसवर टीका : "काँग्रेसचं ६० वर्षे राज्य होतं. त्या काळात बैलजोडी, गाय वासरू, हाताचा पंजा, ही काँग्रेसची चिन्हं होती. त्यावर लोकांनी धडाधड शिक्के मारले. मग कधी रेड्डी काँग्रेस, चड्डी काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस झाली. किती काँग्रेस झाल्या मला माहिती नाही. सगळ्या काँग्रेस इकडेच झाल्या," अशी उदाहरणे देत नितीन गडकरी म्हणाले, "आपली बैलाची जोडी फार हुशार आहे. हिरवं दिसलं की घुसते. कुणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कुणाला मेडिकल कॉलेज, बीएड, डीएड कॉलेज, कुणाला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही आणि गावोगावी काँग्रेसवाल्यांची रोजगार हमी, तुमच्याकडं असलं दुकान आहे."
हेही वाचा -
- यवतमाळच्या पुसदमध्ये नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ - Nitin Gadkari faints
- नितीन गडकरींच्या प्रचार रॅलीत शालेय विद्यार्थी; शाळा प्रशासनावर कारवाईचे आदेश, 'या' काँग्रेस नेत्यानं केली होती तक्रार - Lok Sabha Election 2024
- "मी फोकनाड लिडर नाही, आश्वासनं दिली ते पूर्ण करतो" - नितीन गडकरी - Nitin Gadkari