मनमाड Sharad Pawar in Manmad : केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून असलेलं भाजपाचं सरकार हे फसवेगिरीचं सरकार असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. देशाची सत्ता मोदींच्या हातात आहे. ते बोलतात एक आणि करतात एक. आज नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद सर्वच निवडणुका थांबल्या आहेत. याच्यामुळं लोकशाही जिवंत राहणार नाही. भविष्यात ते सर्वच निवडणूक बंद करतील. यामुळं या मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आलीय, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनमाड इथं जाहीर सभेत व्यक्त केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसंच येत्या 4 तारखेला जे होईल ते देशाला आणि जगाला समजेल असंही पवार म्हणाले.
भाजपावर हल्लाबोल : या सभेत बोलताना पवार म्हणाले, "देशाचा पंतप्रधान नाशिक जिल्ह्यात आले आणि येथील प्रश्नांवर न बोलता ते तुमच्या गळ्यात मंगळसूत्र राहणार नाही. काँग्रेस तुमच्या घरातील सोनं घेऊन इतरांना वाटेल असं बोलले असं बोलून त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही शुद्ध फसवणूक आहे, असं कधीच होणार नाही. ते विचारतात शरद पवार यांनी 10 वर्षात काय केलं, मी अन्नधान्य पूर्ण देश केला. परदेशातून धान्य का आणावं, या राज्यात एका महिन्यात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी कृषी मंत्री असताना याच मनमाडमध्ये माझी सभा होती. इथं कळलं की निर्यात बंदी केली. थेट दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यात उठवली होती, असे निर्णय घ्यावे लागतात. मात्र, हे सरकार कांदा, कापूस, सोयाबीनवर बंदी लावत आहेत. मोदी अभिमानानं सांगतात आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो धान्य पीकवितो कोण? पिकवणाऱ्याचा विचार करणार की नाही."
गरीब श्रीमंत दरी वाढवली : हे सरकार फसवेगिरीचं सरकार आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. जीवन वाचवण्यासाठी आदिवासी झटत असतो. या जगाचा खरा मालक आदिवासी आहे. त्याला जगवा यासाठी मगरे सारख्या शिक्षकाला निवडून द्या, असं आवाहन शरद पवारांनी केलं. तसंच यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात, कांदा हा एकमेव प्रश्न नाही. 10 वर्षात केंद्रानं आपल्याला लुबाडलंय. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतात आणि लाखो रुपये त्यांच्या खिशातून काढून घेतात. त्यांचा 400 पार चा नारा थांबला 200 पार होणार की नाही याची चिंता भाजपाला पडली. देश मूठभर लोक चालवत आहेत. मूठभर लोक श्रीमंत झाली आहेत. देशात गरीब आणि श्रीमंत दरी वाढविण्याचे काम मोदी सरकारनं केलंय, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
हेही वाचा :