अमरावती Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघात अवघ्या 19 हजार 731 मतांनी पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती तथा बडनेराचे आमदार रवी राणा या दोघांनाही भाजपाच्या वरिष्ठांकडून गुरुवारी दिल्लीत बोलवण्यात आलंय. वरिष्ठांचा आदेश येताच राणा दांपत्य गुरुवारी रात्री नागपूर विमानतळावरुन दिल्लीला रवाना झाले आहेत.
नवनीत राणा भाजपाच्या स्टार प्रचारक : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यावर दुसऱ्याच दिवशी नवनीत राणा यांना भाजपाच्या वतीनं स्टार प्रचारक म्हणून देशातील विविध मतदार संघात प्रचारासाठी पाठवण्यात आलं. नवनीत राणा या 2019 मध्ये अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी संपूर्ण पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी भाजपाच्या वतीनं त्यांना अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अटीतटीच्या लढतीत अवघ्या 19 हजार 731 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.
राणा दांपत्य दिल्लीत गेल्यामुळं चर्चांना उधाण : नवनीत राणा यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तातडीनं दिल्लीत बोलवण्यात आल्यामुळं विविध चर्चांना उधाण आलंय. नवनीत राणा यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद मिळेल अशी आशा राणा समर्थकांना वाटत आहे, तर भाजपाच्या स्टार प्रचारक म्हणून राणांनी जी काही मेहनत घेतली त्याचं निश्चितच फळ पक्षाकडून मिळेल अशी चर्चा देखील होत आहे. येत्या एक-दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी नवनीत राणा यांना खास निमंत्रित केलं असावं, असा अंदाज देखील व्यक्त केला जातोय.
हेही वाचा :
- नवनीत राणा यांचा पराभव का झाला? प्रवीण पोटे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतं 'हे' सांगितलं कारण - Pravin Pote Resignation
- "लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024
- नवनीत राणांनी केलं मतदान; सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबत दिलेल्या निर्णयावर दिली 'ही' खास प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024