सातारा Udayanraje Meet Shivendraraje : सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे थोरले चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सोशल मीडियावर दोघांचा जुना फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुपारी थेट शिवेंद्रराजेंच्या सुरूची निवासस्थानी जाऊन उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांना खास स्टाईलनं शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाला जाणार आणि केकही खाणार : आमदार शिवेंद्रराजे यांना वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळीच फेसबुक पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर उदयनराजे वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेला गेले होते. त्याठिकाणी माध्यमांनी पोस्ट संदर्भात विचारलं असता उदयनराजे म्हणाले की, "का पोस्ट करू नये? ते माझे बंधू आहेत. मी त्यांच्या वाढदिवसालाही जाणार आणि जबदरस्तीनं केकही खाणार."
दोन्ही राजेंचा सातारकरांना गोड धक्का : आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांनी अनेकदा पाहिलाय. सध्या दोघंही भाजपामध्ये आहेत. तरीही मागील काळात अनेक कारणांनी दोन्ही राजे आणि त्यांचे समर्थक आमने-सामने आले होते. दोन्ही राजेंच्या गटात धुसफूस सुरू होती. विकासकामे, निधीवरून श्रेयवाद यावरुन आरोप-प्रत्यारोप बघायला मिळाले. त्यामुळं दोन्ही गटातील संबंध काहीसे ताणलेले होते. अशातच शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्यामुळं सातारकरांना गोड धक्का बसला आहे.
दिलगिरी व्यक्त : शिवेंद्रराजेंना शुभेच्छा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, "अनावधानानं माझ्याकडून काही चुकलं असंल, तरी माफी नाही मागणार. पण, दिलगिरी व्यक्त करतो. यापुढं शिवेद्रराजेंनी जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं काही असेल ते बघावं. आज ते पन्नाशीत पदार्पण करताहेत. आज त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असून त्यांचे फोटो काढा. मी सगळे बॅनर लावतो", असं ते म्हणाले.
उदयनराजेंच्या आशिर्वादामुळं दहा हत्तीचं बळ : यावेळी उदयनराजेंच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हा दहा हत्तीचं बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजेंनी दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार. दिल्लीतून निर्णयही लवकर जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल. दिल्लीतून आता सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं. आम्ही उदयनराजे आणि पक्षाबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.
हेही वाचा -