पुणे MP Supriya Sule : देशभरात लवकरच लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलीय. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असून दोन्ही पवारांकडून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. अशातच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी 192 पानांचा आपल्या कार्याचा अहवाल प्रसिद्ध केलाय. 'सेवा, सन्मान, स्वाभिमान' असं म्हणत 2019 ते 2024 या वर्षातील बारामती लोकसभा मतदारसंघातील जनकार्य अहवाल आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्ध केलाय. यात मतदारसंघात केलेली कामं तसंच संसदेत उचललेले प्रश्न मांडण्यात आले आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : या पुस्तिकेत खासदार सुप्रिया सुळेंनी लिहिलंय, "मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण गेली तीन टर्म आपली लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर प्रचंड विश्वास टाकून लोकसभेवर निवडून पाठवलं. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रांजळपणे प्रयत्न करत आहे. गेल्या तीनही कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यांच्या हिताचं संवर्धन करणारे मुद्दे मी आवर्जून संसदेत उपस्थित केले. आज देशातील सर्वोत्कृष्ट खासदार असा होणारा माझा उल्लेख, हा माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. आपण सर्वांनीच माझ्यावर विश्वास टाकून मोठ्या जबाबदारीनं संसदेत निवडून पाठवलं, माय बाप जनतेची सेवा, शेतकरी व महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हीच माझ्या कामाची त्रिसूत्री आहे. हीच त्रिसूत्री जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा आहे आणि दिशाही आहे."
सुप्रिया सुळेंचा प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी आतापासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतंय. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत व्हॉट्स अप स्टेटस ठेवलं होतं. यावरुन त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जातंय. तसंच बारामतीत काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारीचे बॅनर्सही झळकल्याचं पाहायला मिळतंय. अजून महाविकास आघाडीतलं जागावाटप निश्चित झालं नसलं तरी त्यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावलाय. यामुळं खासदार सुप्रिय सुळेंनी आतापासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :