मुंबई Thackeray Group VS MNS : बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यानंतर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्रात मनसैनिक एकही सभा घेऊ देणार नाहीत, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या अवघ्या 8 तासांतच उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील शिवसंकल्प मेळाव्याच्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा ताफा आला असता त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यामुळं हे प्रकरण अजूनच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंविरोधात घोषणाबाजी : राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गाडीवर फेकल्या बांगड्या : उद्धव ठाकरे गडकरी रंगायतनमध्ये दाखल होताच महिला मनसैनिकांनी गोंधळ घालत त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकल्या. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळं तणाव निर्माण झाला. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसैनिकांना ताब्यात घेऊन सभेच्या ठिकाणावरून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी ठाकरेंचे बॅनर देखील फाडण्यात आले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेला सभागृहात सुरुवात करण्यात आली.
मनसेची प्रतिक्रिया : या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, "तुम्ही सुपार्या मारल्या तर आम्ही नारळ मारणार. आज उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील 16-17 गाड्यांवर मनसैनिकांनी नारळ फोडलंय. त्यामुळं कोणीही राज ठाकरेंच्या नादी लागू नये." तसंच जर उद्या कोणत्या कार्यकर्त्यानं राज ठाकरेंविरोधात अपशब्द वापरले तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय मनसैनिक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा -
- बॅनरवरील धनुष्यबाण चिन्ह फाडल्यानं शिंदे गट आणि उबाठा गटात राडा : 'बॅनर फाडताना रंगेहात पकडलं' - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
- मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray Vs Maratha Protestors
- संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024