मुंबई MNS Party Workers Join BJP : मनसेचा महायुतीत समावेश होणार की नाही? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मंगळवारी (9 एप्रिल) होणाऱ्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडं महायुतीतील घटक पक्षांकडून मात्र राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय. मात्र, असं असतानाच भाजपाकडून मनसेला रविवारी (7 एप्रिल) मोठा धक्का देण्यात आलाय. रविवारी भाजपाचे नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तब्बल साडेसहाशे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळं आता भाजपाच्या कृतीवर मनसेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरेच सांगतील : या संदर्भात मनसेचे जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष संदीप ढवळे यांच्याशी संवाद साधण्यात आलं असता ते म्हणाले की, "इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेण्यात आला त्या सभागृहाची क्षमता देखील इतकी नाही. काही पदाधिकारी गेले ही गोष्ट खरी असली तरी, मनसेचे मूळ कार्यकर्ते मात्र आजही आमच्या सोबतच आहेत. साडेसहाशे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा आकडा जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. निवडणुका आहेत, त्यातच उद्या आमचा पाडवा मेळावा देखील आहे. आम्ही सध्या त्याच्या तयारीत आहोत. रविवारच्या पक्षप्रवेशाबद्दल पक्षाची जी काही अधिकृत भूमिका आहे, ती देखील उद्याच्या मेळाव्यात राज ठाकरेच सांगू शकतील."
650 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश : रविवारी सायंकाळी जोगेश्वरी येथे आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जवळपास साडेसहाशे पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्गज, विभागीय अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, दोन विभागीय सचिव, पाच उपविभाग अध्यक्ष, दोन उपसचिव, 11 शाखा अध्यक्ष, 80 महिला उपविभाग प्रमुख, 80 पुरुष उपविभाग प्रमुख आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश आहे. दरम्यान, एका बाजूला मनसेला मैत्रीचा प्रस्ताव देऊन दुसरीकडं मनसेचे इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी भाजपात घेणं, भाजपाच्या या कृतीमुळं सध्या मनसेत नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय.
हेही वाचा -