पुणे Manoj Jarange Patil : राज्यातील राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा समाजानं केली. त्यासाठी नेत्यांच्या घराबाहेर मराठा समाज आंदोलन करत आहे. आज मराठा समाजाकडून शरद पवार यांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला.
पुन्हा एकदा छगन भुजबळांवर साधला निशाणा : "छगन भुजबळ यांना मी सिरीयस घेत नाही. देवेंद्र फडणवीस जसं शिकवतात तसं मंत्री छगन भुजबळ बोलत आहेत. त्यांचं बोलणं म्हणजे जातीय द्वेषानं भरलेलं आहे. त्यामुळं त्याला महत्त्व देण्याची गरज नाही," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला. "आता त्यांना आमची किंमत समजली आहे. ओबीसी, मराठा एकच असून, आता तरी त्यांनी ओबीसीचं वाटोळं करू नये. तसंच राजकीय स्वार्थासाठी गरीब ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं वाटोळं करू नये एवढंच काम करा, बाकीचं किती निवडून आणायचे आणि किती नाही हे मी बघतो," असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केला.
फडणवीस आणि दरेकर यांचं कारस्थान : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मराठा समाजाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, "हे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचं कारस्थान आहे. मराठा समाज हा एकत्र झाला आहे. मात्र, त्यांना समाजात फूट दाखवायची आहे. देवेंद्र फडणवीस यांचं एकच स्वप्न आहे की, त्यांना मराठा समाजात फूट दाखवायची आहे. पण मराठ्यात फूट पडणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.
शरद पवारांनी मांडली भूमिका : "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मी त्यांना सांगितलं की, आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आम्हीही त्या बैठकीला उपस्थित राहू आणि भूमिका मांडू. मला खात्री आहे की मुख्यमंत्री हे सर्वपक्षीय बैठक बोलावतील. केंद्र सरकारला ५०% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी या समस्येबाबत सकारात्मक पाऊल उचललं तर आम्ही त्यांना सहकार्य करू," अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
"
मी दौरा पूर्ण करणार : रविवारी पुण्यात शांतता रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्रास जाणवू लागल्यानं जरांगे पाटलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. "मला दम लागल्यासारखं वाटत होतं आणि ऑक्सिजन देखील मिळत नव्हता. तसंच चक्कर आल्यासारखं वाटत होतं. बीपी देखील खूपच कमी असल्यानं उपचार घ्यायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, सध्या तब्येत बरी असून मी नगरला जात आहे. डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे. मात्र, नियोजित दौरा असल्यामुळं मी दौरा पूर्ण करणार आहे," अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
हेही वाचा -
- "माझ्याविरोधात बोलले त्यांना मागच्या..."; मनोज जरांगे पाटलांचा पंकजा मुंडेंना टोला - Maratha OBC Reservation
- 'त्याला' सोडायचं नाही; मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना डिवचलं - Chhagan Bhujbal
- मनोज जरांगे पाटील 'महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'; पुण्यातील शांतता रॅलीत झळकले पोस्टर - Manoj Jarange Future CM Posters