मुंबई : 'एक है तो सेफ है' ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. मात्र, खरं पाहिलं तर देशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून खरा धोका असल्याची टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. "संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याचा भाजपाचा डाव आहे. जनतेने यापासून सावध राहण्याची गरज आहे," असा आरोप खरगे यांनी नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मानवाधिकार आणि आरटीआय विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'संविधान वाचवा, लोकशाही वाचवा' कार्यक्रमात केला.
संविधानाने समान अधिकार दिले : या कार्यक्रमाला काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटन प्रभारी के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, राष्ट्रवादी (SP) च्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. संविधानाने महिला आणि पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. संघात अद्याप एकही सरसंघचालक महिला झाली नसल्याकडं अभिषेक मनु सिंघवी यांनी लक्ष वेधलं.
जनतेला न्याय मिळवून देणार : "मनुस्मृतीच्या माध्यमातून आधीच भेदभाव करुन भिंती तयार केल्या आहेत. त्यात आता भाजपा आणि संघाने जाती-जातीमध्ये, धर्मांमध्ये विभाजित केले आहे. आम्ही सर्वांना एकत्र ठेवू इच्छितो, मात्र त्यांना केवळ विभाजनातच स्वारस्य आहे. ज्या ठिकाणी सरकार येत नाही त्याठिकाणी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमदारांना फोडून धमकावून भाजपाची सत्ता आणण्याचा पॅटर्न त्यांनी सुरु केलाय. मात्र, हा प्रकार किती दिवस चालवणार? आम्ही संविधानाच्या ताकदीवर या सरकारविरोधात आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देऊ," अशी ग्वाही खरगे यांनी दिली.
नरेंद्र मोदींचा गल्लीबोळात प्रचार : "मोदी, शाह, भाजपा आणि संघाचे नेते दररोज जाती धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मात्र समाजाला एकत्र करण्यासाठी कार्यरत आहोत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिलं. पंतप्रधान मात्र, आमच्या बोलण्यावर देखील सहिष्णुता दाखवत नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गल्लीबोळात प्रचार करत आहेत. भाजपा गेली दहा वर्षे बहुमताच्या जोरावर कोणत्याही विधेयकाला अर्थ विधेयक जाहीर करुन वेळ मारुन नेत होते. मात्र, आता बहुमत नसल्यानं त्यांना असे प्रकार करायची संधी मिळत नाही. धर्मनिरपेक्षता आमचं धोरण आहे आणि आम्ही त्याप्रमाणं वाटचाल करु," असं खरगे यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींची भारत जोडो, त्यांचं मात्र भारत तोडो अभियान : राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' काढली. देश जोडण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी त्यांनी यात्रा काढली. मात्र भाजपाचा भारत तोडो अभियानाचा प्रयत्न असल्याची टीका खरगे यांनी केली. साधुच्या वेशात राहणारे मात्र आता राजकारणात मुरलेले भगवी वस्त्रे परिधान करुन राजकारण करतात. त्यांनी पांढरे कपडे घालावेत, अन्यथा भगवी वस्त्रे घालायची असल्यास त्याचं पावित्र्य जपा आणि राजकारणातून बाहेर व्हा, असा टोला त्यांनी नाव न घेता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला.
हेही वाचा -