मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला अवघे दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना, अद्यापही महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद सुरूच आहेत. मुंबई आणि दिल्लीत याबाबत सतत बैठकांचं सत्र सुरू आहे. अद्याप यावर अंतिम तोडगा निघत नाही. काँग्रेस आणि उद्धव सेना यांच्यात मुंबई आणि विदर्भातील जागांवरून मतभेद असल्यानं हा तिढा अद्याप कायम आहे.
काँग्रेसची अवस्था वाईट : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १४७ जागा लढवल्या होत्या. यंदा त्यांना शंभरी सुद्धा गाठता येत नाही. या कारणानं काँग्रेस नेते, राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना जबाबदार ठरवलंय. दुसरीकडं नाना पटोले यांनी व्यथित होऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना या संदर्भात लिहिलेल्या पत्रानं महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. थोडक्यात, महाविकास आघाडीची सध्याची स्थिती, 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' अशी झालीय.
राज्यात १ नंबरचा पक्ष काँग्रेस : लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीनं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली. मागील चार महिन्यांपासून यासंदर्भात जागा वाटपाची चर्चा आहे. परंतु, आता उमेदवारी अर्ज भरायला केवल दोन दिवसाचा अवधी शिल्लक असताना अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. आधी प्रत्येक पक्षासाठी ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला होता. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन प्रत्येकी ९०- ९०- ९० जागा आणि उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. तरीही अद्याप जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र सुरू असून अंतिम घोषणा न होऊ शकल्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज झाले आहेत.
राजकीय परिस्थिती बदलली : राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, या संदर्भात त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना जबाबदार ठरवलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १४७ जागा लढवल्या होत्या आणि ४४ जागी त्यांनी विजय मिळवला होता. ही विजयाची टक्केवारी कमी असली तरी, आताची राजकीय परिस्थिती बदललेली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले होते. काँग्रेस राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. याकरता आपल्या पदरात अधिकाधिक जागा झोळीत पाडून घ्याव्यात, या प्रयत्नात काँग्रेस आहे.
नाना पटोले यांच्या पत्राने वाद : दुसरीकडं नाना पटोलेंचं पत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशात संजय राऊत यांनी काही जागांची अदलाबदली होऊ शकते, असे संकेत दिले. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनेक ठिकाणी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष करून विदर्भात १२ जागी उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजगी आहे. विदर्भातील सर्वात जास्त जागा लढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असताना, उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याला 'खो' घातला जात आहे. म्हणूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लिहिलंय. या पत्रामुळं उद्धव ठाकरे नाराज झाल्याच्या चर्चा आहेत.
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद : दिल्लीत सीईसीच्या बैठकीदरम्यान राज्यातील अनेक विवादित जागांवर सखोल चर्चा झाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचंही ठरलं. परंतु ही चर्चा होण्याअगोदरच उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद टोकाला गेले असले तरी, काँग्रेसला शिवसेना (उबाठा)शिवाय पर्याय नसल्यानं काँग्रेस विचित्र कोंडीत सापडला आहे.
हेही वाचा -