मुंबई : राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नसून अगोदर महायुती सरकारनं त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, खासदार वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते.
पक्षासोबत नव्हे तर राज्यासोबत गद्दारी : गद्दारी केवळ शिवसेना व शरद पवारासोबत नव्हे तर राज्यासोबत झाली आहे. महाराष्ट्र हे मोदी शाह यांचे गुलाम झाल्यासारखं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. आता हे महायुती सरकार हटवण्याची वेळ आलीय. मुंबईला दोन पोलिस आयुक्त आहेत तुम्हाला वाटत असेल तर आणखी पाच वाढवा, तुमच्या लाडक्या अधिकाऱ्यांना आयुक्त करा. मात्र कारभाराचे काय याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल. गद्दारांच्या घरी धुणी भांडी करणाऱ्यांना देखील सुरक्षा देण्यात आल्याची उपरोधिक टीका ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्र कधीच मोदी, शाहांचा होऊ देणार नाही : "जाहिरातबाजीवर पैसा उधळण्याऐवजी जनतेच्या सुरक्षिततेसाठी वापरण्यात यावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. अत्याचारी भ्रष्टाचारी सरकारविरोधात जनतेच्या न्यायालयात आम्ही आरोपपत्र दाखल करतोय, असं ते म्हणाले. येत्या दोन तीन दिवसांत निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शाहू फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र कधीच मोदी, शाह यांचा होऊ देणार नाही," असं ठाकरे यांनी ठणकावलं.
जनता सरकारला सत्तेवरून हटवेल : राज्याच्या राजधानीत खुलेआम हत्या होत आहे. काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिजीत घोसाळकरांची हत्या झाली. राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घेत नाहीत. खरं तर ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. केवळ जाहिरातींच्या माध्यमांद्वारे जाहिराती देऊन नागरिकांसमोर वेगळं चित्र आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कितीही जाहिराती केल्या तरी खरं चित्र लपणार नाही. जाहिरातींसाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे, जनता या सरकारला सत्तेवरून हटवेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
आमचं हिंदुत्व हृदयात राम व हाताला काम : "सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर संशय निर्माण होणं हे गंभीर आहे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला याचं हे प्रतीक आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जातीय तणाव निर्माण करुन लाभ मिळवण्याचा प्रयत्न करणं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल, मात्र जनता फसणार नाही. आमचं हिंदुत्व हृदयात राम व हाताला काम असं आहे. आम्हाला घरं पेटवायची नाहीत तर घरातील चूल पेटवायची आहे," असं ठाकरे म्हणाले. मोदी, शाह राज्याचे उद्योग गुजरातला पळवत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सत्ताभक्षकांनी आमचं सरकार पाडलं : 2019 ते 2024 हा कालखंड राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा आहे. भाजपानं दगाबाजी केल्यानं मी महाविकास आघाडीत आलो. केवळ सत्तेसाठी लाचार असलेल्या, सत्ताभक्षकांनी आमचं सरकार पाडलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर चालून येणाऱ्या गद्दारांना माफ केलं नाही, आता गद्दारांना डोक्यावर घेऊन नाचवलं जातंय, आता जनताच या सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवेल. मोदी फॅक्टर गुजरातमध्ये असेल महाराष्ट्रात मोदी फॅक्टर चालत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोंदींवर निशाणा साधला.
जनतेचा सत्ता परिवर्तनाचा मूड : गेल्या दीड महिन्यात सरकारनं किती निर्णय घेतले व त्याच्या पैकी किती निर्णयांची अंमलबजावणी झाली, याचा अभ्यास केला तर राज्याच्या प्रशासनाचा लौकिक कळेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला. " मी राज्यात सर्वत्र फिरतोय, जनता सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं बदल घडवला. सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन भ्रष्ट सरकारला हटवू, लोकांची या सरकारच्या तावडीतून सुटका करण्यात येईल, असं शरद पवार म्हणाले.
लाडकी बहिण योजना' भगिनींची फसवणूक करणारी : महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी केलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देतो, मात्र 'लाडकी बहीण योजना' किती कालावधीसाठी आणण्यात आली आहे हे महत्त्वाचं आहे. राजकीय लाभासाठी ही योजना आणण्यात आल्यानं व या योजनेसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्यानं 'लाडकी बहिण योजना' भगिनींची फसवणूक करणारी असल्याची टीका पवार यांनी केली.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य : यावेळी बोलताना शरद पवार यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य केलं. "मला या घटनेबाबत पुरेशी माहिती नाही. हे प्रकरण गंभीर आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल, असं भाष्य आम्ही करणार नाही. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी राज्य सरकार, गृहमंत्री यांची जबाबदारी आहे. त्यांना सत्ता त्याग करण्याशिवाय पर्याय नाही," असं शरद पवार म्हणाले.
जनताच त्यांना सत्तेवरुन पायउतार करेल : राज्यातील महायुतीच्या गद्दार सरकारचा पंचनामा आम्ही करत आहोत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाला काळिमा फासण्याचं पाप सरकारनं केलं, ते आम्ही जनतेसमोर आणतोय. महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याप्रकरणी फडणवीसांनी अद्याप माफी मागितलेली नाही. कालच्या घटनेनं राज्य हादरलंय. सत्ताधारी पक्षाचे नेते देखील असुरक्षित नाहेत. राज्यातील महिला, बालकं, जनता सुरक्षित नाहीत. आता सरकारचा राजीनामा नाही, तर जनताच त्यांना सत्तेवरुन पायउतार करेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्यातील जनता आमच्या पाठीशी : राज्यात शेतकरी आत्महत्या प्रकारात वाढ झाली आहे. पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांचं आयुष्य बरबाद करण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली. आम्ही राज्याला गतवैभव मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही राज्यातील जनता आमच्या पाठीशी राहील हा विश्वास आहे. राज्य वाचवायचं आहे, महाराष्ट्र द्रोही सरकार हटवायचं आहे, त्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा