मुंबई Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाड़ीची गुरुवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलं नाही. यामुळं 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'वंचित'बाबत मोठी घोषणा केली आहे. ३० तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत एकत्र असणार आहे. आता सर्व गैरसमज दूर झाले असल्याचं नाना पटोले यावेळी म्हणाले.
पुढील बैठक 30 जानेवारीला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महाविकास आघाडीनं मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपावर चर्चा करण्यात आली. तसंच पुढील बैठक 30 जानेवारीला होईल, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
48 जागा जिंकण्याचा निर्धार : लोकसभा निवडणुकीतील 48 जागा जिंकण्याचा आमचा निर्धार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून, जागावाटपाबाबत कोणताही वाद किंवा गैरसमज नाही. जी राष्ट्रवादीची जागा आहे, ती त्यांच्या वाट्याला जाईल. जी शिवसेनेची जागा आहे, ती शिवसेनेच्या वाट्याला जाईल आणि जी काँग्रेसची जागा आहे, ती त्यांच्या वाट्याला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि 'वंचित' यांना कोणत्या भागातील जागा द्यायच्या हे येणाऱ्या पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यात येईल. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत : महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर येत होती. असा प्रश्न संजय राऊताना विचारला असता, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दिल्लीमधील नेत्यांशीसुद्धा आम्ही चर्चा केली आहे. त्यांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीत सगळे सुरळीत सुरु आहे. 'मविआ'त कोणतेही मतभेद नसल्याचं संजय राऊत म्हणाले.
पुढील बैठकीत प्रकाश आंबेडकर येणार : 30 जानेवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील येणार आहेत. त्यामुळं प्रकाश आंबेडकर नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा देखील जागा वाटपासाठी विचार होणार असून, राजू शेट्टींची आम्ही चर्चा करत आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
ही लढाई हुकूमशाहविरोधी : सध्या देशात सत्ताधारी भाजपा हुकूमशाह पद्धतीनं वागत आहे. त्यामुळं संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमधील सर्वजण एकत्र आलो आहोत. या लढाईत प्रकाश आंबेडकरांनी पण यावं ही सगळ्यांची इच्छा आहे. तसेच मोदींच्या हुकूमशाहविरोधात लढण्यासाठी देशातील सर्वांनी एकत्र यावं, असं प्रकाश आंबेडकरांनीही म्हटलं आहे. त्यामुळे आमची लढाई ही मोदींविरोधी आणि मोदींच्या एकाधिकारशाही विरोधात असल्याचं संजय राऊत म्हणाले.
'इंडिया' आघाडी मजबूत : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींची भेट घेणार नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे नितीश कुमार हे 'इंडिया आघाडी'तून बाहेर पडणार का? किंवा नितीश कुमार हे नाराज आहेत का? असं संजय राऊत यांना विचारलं असता, 'इंडिया आघाडी' अत्यंत मजबूत आहे. नितीश कुमार हे त्यातील एक महत्त्वाचे घटक असून, ते 'इंडिया आघाडी'तून बाहेर पडतील असं वाटत नाही, असंही राऊत म्हणाले.
48 जागांवर एकमत - आव्हाड : आमची सकाळपासून बैठक सुरू होती. आता सायंकाळी बैठक संपली आहे. त्यामुळे बैठक अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न झाली. कोणताही गैरसमज नाही. जवळपास 48 जागांवर महाविकास आघाडीमधील नेत्यांचं एकमत झाले आहे, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ज्या जागेवर समोरील पक्ष कोणता उमेदवार देणार आहे, त्याच्या तोडीचा महाविकास आघाडीमधून उमेदवार असेल यावर बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे जवळपास सर्वच जागांवर आमचे एकमत झाले आहे. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि पुढील बैठकीत आंबेडकर येतील, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
हेही वाचा -