अहिल्यानगर : भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षामुळं अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण चांगलच तापलय. कार्यकर्त्यांवर दहशत केली तर गाडून टाकू, तसंच मुख्यमंत्री सोडा, तुम्ही आमदारसुद्धा होणार नाही. असा थेट इशारा भाजपाचे संगमनेर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलाय.
बाळासाहेब थोरातांवर टीका : बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यातील तळेगाव दिघे येथे सुजय विखेंचं जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाषणात बोलताना सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांचा चांगलाच समाचार घेतला. संगमनेरमध्ये फक्त नातेवाईकांचं राजकारण चालतं, मात्र माझी सोयरीक जुळलीच नाही, असं म्हणत विखेंनी पुन्हा एकदा थोरातांवर निशाणा साधलाय.
आमदार होणंसुद्धा अवघड : "आता असा गडी आलाय, की जो तुमचं ऐकणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांचं आता आमदार होणं सुद्धा अवघड झालय. मुख्यमंत्री सोडा, तुम्ही आमदार सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती आहे. लोकसभेला दुर्दैवानं माझा पराभव झाला," असं सुजय विखे पाटील म्हणाले.
पुढची चाळीस वर्षे युवकांच्या उज्वल भवितव्याची : "चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पदं मिळाली, पण निधी आणता आला नाही. विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला 44 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचं पाणी आलं. अनेक वर्ष विखे पाटलांवर टीका करण्यात आली, पण साईबाबांच्या आशीर्वादानं विखे पाटील कुटुंबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचं पाणी आणून दाखवलं. आता भोजापूर चारीचं पाणीसुध्दा विखे पाटीलच आणून दाखवतील," असा दावा सुजय विखेंनी यावेळी बोलताना केला. पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्ज्वल भवितव्याची असतील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा : आजची सभा तालुक्यातील परिवर्तनाची नांदी आहे. आमचा कार्यकर्ता शिवरायांचा मावळा आहे, पाकीट संस्कृतीत आमचा कार्यकर्ता वाढलेला नाही, अशा शब्दात त्यांनी थोरातांचा समाचार घेतला. महायुतीत संगमनेरची जागा ही भाजपालाच सुटण्याचा विश्वास सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त करत येत्या दोन दिवसात संगमनेर बाबतचं चित्र स्पष्ट होणार.
संगमनेरची जागा भाजपालाच सुटणार : भाजपाचे माजी खासदार सुजय विखे हे संगमनेर मतदार संघातून थेट बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तसं त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवलय. मात्र, दोन दिवसांपूर्वी संगमनेरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला दिली जाणार असून सुजय विखेंना संगमनेरची उमेदवारी दिली जाणार नसल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर आज सुजय विखे यांनी माध्यमांसमोर येत संगमनेरची जागा भाजपालाच सुटणार असल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा