मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराभव महायुतीतील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातून धडा घेत येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा कमबॅक करत राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु हे सर्व होत असताना महायुतीमधील काही नेते एकमेकांवर आरोप करण्यामध्ये मग्न आहेत. त्यामुळे महायुतीतील वरिष्ठ नेते संतापले आहेत.
मागील १४ वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून शिवसेना शिंदे पक्षाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. रवींद्र चव्हाण चमकोगिरी करत असल्याचा आरोप कदम यांनी केला. तर कदम यांनी मागील ४० वर्षात कोकणासाठी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत रामदास कदम यांचे थोबाड फोडण्याची भाषा करत चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलं. तर या दोन नेत्यांमधील वादावर बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट महायुती तोडण्याची भाषा केली आहे. "केवळ भाजपला महायुतीची गरज नसून तर ती सर्वांना आहे. त्यामुळे भाजपाच्या संयमाला कोणीही दुबळेपणा समजू नये," अशा कडक शब्दात दरेकर यांनी इशारा दिला आहे.
राष्ट्रद्रोही नवाब मलिक यांच्यामुळे वाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे तुरुंगामधून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना त्यांच्याविषयी पत्र लिहिले होते. आम्ही राष्ट्रप्रेमी अजून राष्ट्रद्रोही व्यक्ती महायुतीमध्ये नको, अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. इतकं सर्व होऊनसुद्धा नवाब मलिक यांना अजित पवार यांनी त्यांच्या पक्षात घेतले आहे. त्याचसोबत अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये नवाब मलिक यांचा सहभाग दिसून आला. इतकेच नाही तर, नवाब मलिक यांच्या मुलीला अजित पवार यांनी पक्षात प्रवक्तेदाची जबाबदारी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीला नाहक फटका बसणार- याबाबत बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, "सर्वांनी महायुतीमधील धर्माचे पालन करणं आवश्यक आहे. महायुतीची गरज फक्त भाजपलाच आहे, असं नाही. परंतु महायुतीमधील इतर घटक पक्षाचे काही नेते स्वतःला सर्वस्व समजत आहेत. नको त्या पद्धतीची विधाने करत आहेत. त्याचा महायुतीला नाहक फटका बसणार आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही प्रकार झाला, तसा प्रकार विधानसभेत होता कामा नये, यासाठी भाजप कटिबद्ध आहे. जर इतर घटक पक्षांनी तशा पद्धतीची साथ भाजपला दिली नाही तर, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडायला वेळ लागणार नाही," असेही दरेकर म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीतून बोध घेण्याची गरज- दुसरीकडे अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातील जनसन्मान यात्रेत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून झालेले हे वर्तन अजित पवार गटाच्या नेत्यांना चांगलेच झोंबले. तर सध्या राज्यभरात चर्चेचा विषय असलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' या माध्यमातून राज्यातील महिलांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मात्र या योजनेमध्ये मुख्यमंत्री शब्दाचा वापर केला जात नाही. यावरून शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
श्रेयवादाची लढाई होते- रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोलीचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे विश्वासघातकी असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे म्हणाले,"महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व गोष्टी होत आहेत. अशातच राज्यातील प्रमुख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जर सहयोगी पक्ष अजित पवार गट मुख्यमंत्री शब्दालाच डावलत असेल असेल तर ती श्रेयवादाची लढाई होते. विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जात असताना अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे लोकसभेत बसलेला फटका पुन्हा विधानसभेत बसू शकतो. त्यामुळे यातून बोध घेण्याची गरज आहे," असेही वाघमारे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी- महायुतीत धुमसत चाललेल्या या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीही भाष्य केलं आहे. रामदास कदम यांचे काही म्हणणं असेल तर त्यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ते मांडावे. प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणे हे योग्य नसल्याचं सांगत त्यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांच्यावर शरसंधान साधले आहे.
तसेच या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, महायुतीतील सुरू असलेल्या वादासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे. महायुतीमधील अंतर्गत वादामुळे त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत पक्षाला कशा पद्धतीने बसू शकतो याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या कानावर घातल्याची माहिती आहे.
हेही वाचा-