मुंबई Uddhav Thackeray Group : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे भाजपाला साथ देत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष मजबूत करण्यासाठी जीवाचं रान करत महाराष्ट्रात दौरे करत आहेत. उद्धव ठाकरे यांचा सध्या कोकण दौरा सुरू असतानाच त्यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. हा धक्का शिंदेच्या शिवसेनेकडून नव्हे तर चक्क मनसेकडून देण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसेत दाखल : दादरा , नगर हवेली, सिल्वासा या केंद्र शासित प्रदेशातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रविवारी (4 फेब्रुवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दिगेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. जवळपास 400 ते 500 कार्यकर्त्यांनी रविवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची व्याप्ती राज्याबाहेरदेखील वाढताना दिसणार आहे. "ठाकरे गटाचे स्थानिक खासदार, नेते, पदाधिकारी आमच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे" दिगेश जोशी यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला खिंडार : आगामी लोकसभा निवडणूकीचे बिगुल कधीही वाजू शकते. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष दौरे आणि सभा करीत आहे. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. तर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असतांना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाच्या सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
हेही वाचा -