मुंबई MLC Election Results 2024 : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय संघर्षाचा निकाल समोर आला. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उभे असल्यानं चुरस वाढली होती. तसंच कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली होती. भाजपाकडे संख्याबळ असल्यानं भाजपाचे सर्व पाचही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजपा नेत्यांना होता. तर, महायुती म्हणूनही आमचे सर्वच 9 उमेदवार जिंकतील, असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यांचा दावा खरा ठरला आणि महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या तीनपैकी दोन उमेदवारांचा विजय झाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पराभूत झाले.
विधानपरिषदेचे 11 विजयी उमेदवार :
भाजपाचे विजयी उमेदवार :
1. योगेश टिळेकर, 26 मतं
2. पंकजा मुंडे, 26 मतं
3. परिणय फुके, 26 मतं
4. अमित गोरखे, 26 मतं
5. सदाभाऊ खोत, 26 मतं
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार :
6. भावना गवळी, 24 मतं
7. कृपाल तुमाने, 25 मतं
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार :
8. राजेश विटेकर, 23 मतं
9. शिवाजीराव गर्जे, 24 मतं
काँग्रेस विजयी उमेदवार :
10. प्रज्ञा सातव, 25 मतं
शिवसेना ठाकरे गट विजयी उमेदवार :
11.मिलिंद नार्वेकर, 24 मतं
- जयंत पाटील (शेकाप) : 12 मतं, पराभूत
अजित पवारांकडं 5 मतं अधिक : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं 39 आमदार आहेत. राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे हे त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 46 मतांची गरज होती. अजित पवार यांना 7 मतं कमी पडत होती. अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना 23 तर शिवाजीराव गर्जे यांना 24 मतं पडली आहेत. म्हणजेच अजित पवार गटानं काँग्रेसची 5 मतं फोडल्याचा संशय आहे.
'शेकाप'च्या जयंत पाटलांचा पराभव : महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. नार्वेकर यांना 24 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या हमखास विजयी होणार होत्या. त्या पद्धतीनं त्यांना 25 मतं मिळाली. तर शरद पवार गटाकडून पाठिंबा देण्यात आलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना मात्र 12 मतं पडली व त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
कसं झालं मतदान : भाजपाकडं 115 मतं होती, त्यांना पहिल्या पसंतीची 118 मतं पडली म्हणजे भाजपाला 3 मतं अधिक पडली. काँग्रेसकडं 37 मतं होती. त्यांच्या उमेदवार सातव यांना 25 मतं देऊन काँग्रेसकडं 12 मतं शिल्लक राहत होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं 17 मतं होती. त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना निवडून येण्यासाठी काँग्रेसच्या 6 मतांची गरज होती. परंतु, नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेसची 7 मतं फुटली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं 42 मतं असताना दोन्ही उमेदवारांनी मिळून 47 मतं घेतली. म्हणजेच त्यांना 5 मतं जास्त मिळाली आहेत.
हेही वाचा :