मुंबई Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांमध्ये झालेली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीनं लढली गेली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता अखेर मतमोजणीचा दिवस उजाडलाय. या मतमोजणीत नेमकं काय चित्र स्पष्ट होणार, याकडं सर्व देशाचं लक्ष लागलंय. राज्यातील 48 मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार याचा निकाल मंगळवारी (4 जून) दिवसभर 'ईटीव्ही भारत'वर तुम्हाला पाहता येणार आहे.
राजकीय गणित बदलणार : राज्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'ला ४२ जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती वाईट होती. यावेळेस अधिक जागा निवडून आणण्याचा दावा एनडीएनं केला होता. मात्र, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि मतदारांनी व्यक्त केलेला असंतोष, उद्धव ठाकरे यांच्याबाबत मतदारांमध्ये निर्माण झालेली सहानुभूती या सर्व पार्श्वभूमीवर ही गणितं निश्चितच बदलली जातील, अशी चर्चा आहे. त्यामुळं निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
आम्हीच विजयी होणार : महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सर्वात मोठी आणि महत्त्वाची म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीकडं पाहिलं जातं. महायुतीकडं तीन मोठे पक्ष आणि महाविकास आघाडीकडं तीन मोठ्या पक्षांचं बलाबल आहे. त्यामुळं आता आम्हीच विजयी होणार, असा विश्वास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही करत आहेत.
'या' जागांवर असेल लक्ष :
- नागपूर : नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे
- अमरावती : नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे
- चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर
- बीड : पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे
- औरंगाबाद : चंद्रकांत खैरे विरुद्ध संदिपान भूमरे
- रावेर : रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील
- बारामती : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार
- पुणे : मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर
- कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक
- सोलापूर : प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते
- सातारा : उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे
- रत्नागिरी-सिंधुदूर्ग : नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत
- ठाणे : राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के
- कल्याण : श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर
- मुंबई उत्तर : पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील
हेही वाचा :