पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. अशातच आज (6 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात राज्यातील बीआरएस पक्ष विलीन झालाय. बीआरएस पक्षाचे प्रमुख बी. जी. देशमुख यांच्यासह पक्षातील समन्वयक आणि कार्यकर्ते यांनी आज शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
पक्षाचे 22 लाख सभासद : बीआरएस पक्ष विलीन झाल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "संपूर्ण देशात एक कुतूहल होतं की, बीआरएस पक्ष काय करेल? राज्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता अनेक लोकांनी या पक्षाला साथ दिली. आज 288 जागा मतदार संघात या पक्षाचे 22 लाख सभासद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी वर्गाला न्याय द्यायचा आहे. येत्या 2 ते 3 दिवसात बीआरएस पक्षाचे पदाधिकारी आणि आमचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदारी देण्यात येईल."
बीआरएस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार एकच : यावेळी बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब देशमुख म्हणाले की, "तेलंगणातील काम पाहता, राज्यात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहोत. मागील दोन वर्षात राज्यातील विविध भागात पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. आत्ता लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यातील शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. बीआरएस पक्षाचे जे विचार आहेत, तेच विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आम्हाला शरद पवार जबाबदारी देणार आहेत. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करणार आहोत."
हेही वाचा
- "महाराजांच्या नावानं मतं मागता तर मग...."; शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचं नाव घेत म्हणाले... - SambhajiRaje Chhatrapati
- कत्तलखान्यास भाजपाचा विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास इमारतीवरून उडी मारू, नरेंद्र मेहता यांचा इशारा - Mira Bhayander Slaughterhouse
- खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक करा; माजी खासदार राहुल शेवाळेंची मागणी - MP Chandrakant Handore