मुंबई : 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असला तरी त्यांच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे बदल झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या बदलामुळेच भाजपानंही राजपुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्यासोबतची मैत्री वाढवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपानं वेळप्रसंगी एकनाथ शिंदेंची शिवसेना दुखावली तरी चालेल, परंतु राज हित जपणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका घेतल्याचं एकंदरी चित्र आहे. या कारणानं भाजपा-राज ठाकरे यांची ही मैत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी भविष्यात धोक्याची घंटा निर्माण करू शकते.
तिकीट कापणं शिंदे यांना योग्य वाटत नाही : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये आवश्यकता नसतानाही अजित पवारांना सामील करून घेण्याचा निर्णय भाजपानं घेतला. या कारणानं शिंदेंची शिवसेना दुखावली. यानंतर लोकसभे पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीतही या तीन घटक पक्षांच्या महायुतीत जागावाटपावरून अनेक मतभेद झाले. राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत सामील करून घेण्याचा प्रयत्न लोकसभेतही झाला. परंतु राज ठाकरे यांनी लोकसभेला निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत, मोदींना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला. तर आता विधानसभेला राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तरीही भाजपानं राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदार संघामध्ये पूर्ण पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे.
सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम : माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो मागे घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे. तरीही कुठल्याही परिस्थितीमध्ये सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. याच मुद्द्यावरून आता भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा पडद्याआड जुंपली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सदा सरवणकर यांचं तिकीट कापणं हे शिंदे यांना योग्य वाटत नाही, अशी माहिती समोर येत आहे. तर सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपा आग्रही आहे. ज्या 'राज'पुत्रासाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे, त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र दुरून या गोष्टींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. सोमवार (4 नोव्हेंबर) हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं सदा सरवणकर कुठला निर्णय घेतात याकडे सर्वात जास्त भाजपाचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे घराण्याची साथ कायम असणं गरजेचं : राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी या मुद्द्यावर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं की, सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोन येऊ शकतो. भाजपाला ठाकरे घराण्यातील एका ठाकरेला अत्यंत जवळचं करायचं आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. येणाऱ्या दिवसात 'मातोश्री'ला लांब ठेवून शिवतीर्थाचं वजन कसं वाढवलं जाईल, याकडे भाजपाचा प्रयत्न राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्यातच भाजपाचं हित आहे. हे आता भाजपा नेत्यांच्या लक्षात आलं आहे. भविष्यात एकनाथ शिंदे गटाची ताकद किती राहील? यावर संभ्रम असताना राज्यात तसंच मुंबईत ठाकरे घराण्याची साथ कायम असणं गरजेचं आहे. याच कारणानं क्षेत्रीय अस्मितेच्या मुद्द्यावर लढणारी मनसे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर व्यापक झाली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या बोलण्यातूनच राज ठाकरे यांच्याबाबत असलेली भाजपाची भूमिका स्पष्ट होते.
मनसेची आतापर्यंतची राजकीय वाटचाल
- 2009 – स्वबळावर
- 2014 – भाजपाला पाठिंबा
- 2014 – विधानसभा लढवण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय
- 2014 – निवडणूक लढवण्याच्या निर्णयापासून माघार
- 2019 – भाजपाच्या विरोधात 'लाव रे तो व्हिडिओ'
- 2024 – नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा
विधानसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते
- 2009 – 5.71 टक्के
- 2014 – 3.15 टक्के
- 2019 – 2.25 टक्के
लोकसभा निवडणुकीत मनसेला मिळालेली मते
- 2009 – 4.1 टक्के
- 2014 - 1.5 टक्के
हेही वाचा