पुणे : राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज (18 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या शेवटच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी पवारांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केलं. देशात कोठेही जा, बारामतीचं नाव घेताच लोक आणखी एक नाव घेतात. ते म्हणजे शरद पवार. बारामतीत तुम्ही माझी निवड केली, त्यानंतर अजित पवार यांची निवड केली. आता युगेंद्र पवार यांची निवड करा असं, आवाहन शरद पवारांनी केलं.
दोन्ही पवारांकडून शक्तिप्रदर्शन : राज्याचं नव्हे, तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यानं बारामतीत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होत आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पवारांकडून शक्तिप्रदर्शन करत आपापली भूमिका मांडण्यात आली. बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवार बोलत होते.
मोदींचा हेतु पुर्ण होऊ दिला नाही : "लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यानं देशाला दाखवून दिलं की महाराष्ट्र काय चिज आहे. राज्यातील जनतेनं तेव्हा महाविकास आघाडीला साथ दिली. पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी 400 खासदार निवडून द्या, असं आवाहन करत होते. देशाचा कारभार करायचा असेल, तर 400 खासदारांची गरज नसते. घटनेत बदल करायचा असेल तर 400 खासदार लागतात. त्यामुळं मोदींचा हेतु काय होता हे स्पष्ट आहे. मोदींचा राज्यघटना बदलण्याचा विचार होता, ते जनतेला पटलं नाही. लोकसभेत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मोदींचा हा हेतु पुर्ण होऊ दिला नाही. मोदींना आवर घालण्यासाठी तुम्ही मदत केली. आत्ता विधानसभा निवडणुकीतही अशीच मदत करा," असं आवाहन पवारांनी जनतेला केलं.
द्योजकांचं 18 हजार कोटी माफ केलं : राज्य सरकारच्या 'लाडकी बहिणी योजने'वर बोलताना शरद पवार म्हणाले, "सरकार महिलांचा सन्मान केल्याचं सांगत आहे. पण आज राज्यात बहिणीची अवस्था काय झाली आहे. राज्यात 64 हजार मुली बेपत्ता आहेत. शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात 20 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्जबाजारीमुळं या आत्महत्या झाल्या. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी मदत करायला हवी होती, तसं न करता त्यांनी 16 उद्योजकांचे 18 हजार कोटी माफ केले," अशी म्हणत शरद पवारांनी मोंदींवर निशाणा साधला.
हेही वाचा