मुंबई : विधानसभा निवडणुका राज्यात केव्हा लागू होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं चर्चा होत होती. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यात सद्यस्थितीत असलेल्या महायुती आघाडीमध्ये आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये काय परिस्थिती राहील, हे पाहणं औत्सुक्याच आहे.
महायुतीचं संख्याबळ : 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून 105 जागा जिंकून समोर आला होता. त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये होती. त्यावेळी शिवसेनेला 56 जागा जिंकता आल्या होत्या. तर विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर तर 44 जागा जिंकून काँग्रेस चौथ्या स्थानावर होती.
राज्यात झाला राजकीय भूकंप : मात्र, सत्तेची सर्व गणित बदलत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापन केली. तर भाजपा पक्ष विरोधात बसला. त्यानंतर भाजपानं शिवसेना पक्षाला फोडत शिंदे गट सोबत घेतला आणि नव्यानं सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फाटा फूट होऊन अजित पवार 40 आमदारांसह बाहेर पडून पुन्हा सत्तेमध्ये बसले.
महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर मित्र पक्षांची युती आहे. त्यामुळे महायुतीची संख्याबळ सध्या 162 इतके तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मिळून आघाडीकडे 105 जागांचं संख्याबळ आहे.
महायुतीमध्ये पुन्हा फाटा फूट : दरम्यान, महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार या दोन संघटना बाहेर पडल्या असून या दोन संघटनांनी पुन्हा आपला सवता सुभा उभा केला आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत सध्या दोन्ही आघाड्यांचं पारडं समसमान असून कोणती आघाडी सत्ता स्थापन करते याकडे आता मतदारांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा