ETV Bharat / politics

कोल्हापुरात वातावरण टाईट, विधानसभेला 'टफ फाईट'; 10 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडी - महायुती आमनेसामने

राज्यातील विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली. कोल्हापुरात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

KOLHAPUR ASSEMBLEY ELECTION 2024
कोल्हापुरात महाविकास आघाडी- महायुती आमनेसामने (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 7:24 PM IST

Updated : Oct 17, 2024, 2:07 PM IST

कोल्हापूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (15 ऑक्टोबर) केली. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यात 10 जागांपैकी 8 जागांवर थेट महाविकासआघाडी विरोधात महायुती अशी लढत होणार आहे. तर एका जागेवर जनसुराज्यशक्ती पक्ष आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार कडवी झुंज देणार आहे. संभाव्य लढती अजूनही स्पष्ट नसल्या तरी उमेदवारांकडून पक्षीय पातळीवरच्या हालचालींना वेग आलाय. राज्यातील महत्त्वाचे दोन पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं जिल्ह्यात यंदा 'टफ फाईट' बघायला मिळणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीशचंद्र कांबळे यांच्यासह 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शहरातील अंतर्गत प्रश्नांपेक्षा राजेश क्षीरसागर यांना असणारा विरोध मतपेटीतून पाहायला मिळाला. काँग्रेसन या जागेवर विजय मिळवला. पुढे 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानं त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि या लढतीत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव विजयी झाल्या. मात्र, भाजपानं पोटनिवडणुकीत दिलेल्या लढतीमुळे आता ही जागा महायुतीतील भाजपाकडे जाते की मुख्यमंत्र्यांकडे असलेलं आपलं वजन वापरून राजेश क्षीरसागर तिकीट मिळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार.

महायुतीकडून पोटनिवडणूक लढलेले सत्यजीत कदम, कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, रविकिरण इंगवले, शरदचंद्र पवार पक्षाकडून आर. के. पवार आणि काँग्रेसकडून राजघराण्यातील सदस्य मधुरिमाराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे यांच्यापैकी कोण रिंगणात असणार याचा निर्णय लवकरच होईल.

शौमिका महाडिक निवडणुकीच्या मैदानात उतरणार? : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत पारंपरिक राजकीय विरोधक महाडीक आणि सतेज पाटील कुटुंबियातील उमेदवारांतच झाली होती. यंदाही तशीच लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अमल महाडीक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात 'हाय होल्टेज' लढत पाहायला मिळाली. 74 टक्के मतदान झालेल्या लक्षवेधी लढतीत ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली. यंदाच्या वर्षी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक असणार की महिला मतदारांची सर्वाधिक संख्या असल्यानं शौमिका महाडिक यांना मैदानात उतरवलं जातं का? हे पाहणं लक्षवेधी असणार आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील विरोधात चंद्रदीप नरके अशी लढत झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 710 मतांनी चंद्रदीप नरके विजयी झाले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा बदला घेत काँग्रेसचे पी.एन. पाटील यांनी 22 हजार 661 मतांनी विजय मिळवला. मात्र, यंदा 23 मे रोजी आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्यानं या जागेवर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय, तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून संताजी घोरपडे यांनीही विधानसभेची तयारी केलीय.

शिरोळ विधानसभा मतदारसंघ : ऊस दर आंदोलनाचं केंद्र असलेल्या शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने अशी मातब्बर मंडळी असताना मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यंदाही विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील, काँग्रेसकडून गणपतराव पाटील तर तिसरी आघाडी असलेल्या महाशक्ती परिवर्तनकडून सावकार मादनाईक यापैकी कुणाच्या नावावर उमेदवार म्हणून मोहोर लागते, हे पाहावं लागेल.

चंदगडमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना : कर्नाटक आणि गोवा राज्याला लागून असलेला आणि राज्याचा दक्षिणेकडील शेवटचा मतदारसंघ अशी ओळख असलेला चंदगड विधानसभा मतदारसंघाची यंदाच्या निवडणुकीत समीकरणं बदलली आहेत. भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केलीय. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं चंदगडचा सामना राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांमध्ये होणार असून शरद पवार विरुद्ध अजित पवार अशा या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तर शिवसेनेचे संग्राम कुपेकर, भाजपाचे शिवाजीराव पाटील, काँग्रेसचे अप्पी पाटील या बंडखोरांना रोखण्याचं आव्हान महाविकास आणि महायुतीसमोर असणार आहे.

शाहूवाडी मतदारसंघात कडवी झुंज : 2019 मध्ये शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरूडकर विरुद्ध जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्यात अतितटीची लढत झाली होती. यात विनय कोरे 27 हजार 863 मतांनी विजयी झाले. यंदाही येथे कोरे-पाटील अशी पारंपरिक लढत होईल, मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावर लढलेल्या सत्यजित पाटील सरूडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली. सत्यजित पाटील-सरूडकर हे विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या विरोधात उभे आहेत, त्यामुळं यंदा कोण बाजी मारणार? याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

विद्यमान आमदारासमोर तगडं आव्हान : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघातून गत निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर, काँग्रेसचे राजू आवळे, जनसुराज्यचे अशोक माने, ताराराणी आघाडीचे किरण कांबळे, अपक्ष माजी आ. राजीव आवळे अशी बहुरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे राजूबाबा आवळे विजयी झाले. मात्र, यंदा राज्याच्या राजकारणाची फेरमांडणी झाल्यामुळं विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांच्या विरोधात भाजपकडून अशोकराव माने, परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचं तगडं आव्हान असणार आहे.

राधानगरीत मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील, राहुल देसाई अशी भली मोठी इच्छुकांची यादी असली तरी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई यांच्यापैकी महाविकासआघाडी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, यावर या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढतीत प्रकाश आबिटकर यांनी 18 हजार 430 मतांनी बाजी मारली. यंदा आबिटकरांच्या विरोधात पाव्हणं-मेव्हण्यांच्या भांडणात महाविकास आघाडीची उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे.

कागल उत्तर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत : जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल उत्तर विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वाधिक लक्षवेधी लढत होणार आहे. गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संजय घाटगे, अपक्ष उमेदवार समरजिसिंह घाटगे अशी तिरंगी लढत झाली. अपक्ष म्हणून घाटगे यांनी घेतलेली 88 हजार मतं सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. यंदा सत्तेच्या सारीपाटावर बदललेली गणितं पाहता मंत्री मुश्रीफांविरोधात कडवी टक्कर दिलेले कागलच्या शाहू समूहाचे प्रमुख समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय, तर माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांची विधानसभा लढवण्याची इच्छा आहे. संजय घाटगे यांची या निवडणुकीत मुश्रीफ यांना मिळालेली साथ कार्यकर्त्यांना कितपत पचते यावर युतीचं गणित अवलंबून असणार आहे. मंत्री मुश्रीफ यांनी शरद पवारांची सोडलेली साथ घाटगे यांच्या पथ्यावर पडणार का? या प्रश्नांची उत्तरं आता काहीच दिवसात मिळणार आहेत.

इचलकरंजीत नवा चेहरा विधानसभेच्या रिंगणात : एकहाती सत्ता राखलेल्या आवाडे कुटुंबातील नवीन चेहरा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे. भाजता पक्षात प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे भाजपकडून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार असणार आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतीय सदस्य मदन कारंडे आहेत. मात्र, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्यानं इचलकरंजी विधानसभेची निवडणूक दुरंगी होणार की बहुरंगी? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

8 जागेंवर महायुती विरोधात महाविकास आघाडी लढत : राज्यातील प्रमुख 2 पक्षात फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणाची बदललेली राजकीय समीकरणं पाहता पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 10 जागांपैकी 8 जागेंवर थेट महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सत्तेच्या आखाड्यात कोण कुणाला आसमान दाखवणार? कुणाकडून कोण चितपट होणार? आणि विजयाची गदा कोण उंचावणार? याकडे आता अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. "दादा न्याय देतील असं वाटलं होतं, पण…", पुणे शहराध्यक्षांनी व्यक्त केली खदखद; घेतला मोठा निर्णय
  2. मेळघाट मतदारसंघात महायुतीत मारामारी, महाविकास आघाडीची शांततेत तयारी
  3. विधानसभा निवडणूक 2024; भाजपा नेते लागले तयारीला, देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी, आज रंगणार उमेदवारीवर खलबतं

Last Updated : Oct 17, 2024, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.