बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आमदार श्वेता महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिखली येथे आले होते. यावेळी महायुतीमध्ये होत असल्या बंडखोरीवर त्यांनी मोठं विधान केलंय. तसंच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
श्वेता महाले यांनी अनेक विकासकामं केली : "श्वेता महाले यांनी या मतदारसंघात अनेक विकासकामं केली. गाव-शहरातील रस्त्यांबाबत, पिण्याच्या पाण्याची योजना, सिंचनाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या असतील प्रत्येक बाबतीत श्वेता यांनी या मतदारसंघात कामं केली आहेत. महाराष्ट्राच्या विधानमंडळानं उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा गौरव देखील केलाय. त्यामुळंच भाजपानं महायुतीच्या उमेदवार म्हणून श्वेता यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलीय. मला विश्वास आहे की, यावेळी त्या जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील," असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
बंडखोरीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान : "बंडखोरी रोखण्याकरीता आम्ही सगळे नेते एकत्रित बसू आणि जिथं जिथं ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी अर्ज भरला असेल, त्या त्या पक्षाचे लोक त्यांना अर्ज मागं घ्यायला लावतील. महायुती एक आहे, अधिकृत उमेदवार तोच आमचा उमेदवार आहे. जिथं कमळ दिलंय, तिथं कमळच आमचा उमेदवार आहे. जिथं धनुष्यबाण दिल, तिथं धनुष्यबाणच आमचा उमेदवार आहे आणि जिथं घड्याळ दिलं, तिथं घड्याळच आमचा उमेदवार आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचा