मुंबई Lok Sabha Election 2024 - महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून आता सर्व घटक पक्ष एकत्रित ताकदीने लढतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबई पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या काही जागांवर असलेला तिढा आता संपुष्टात आला असून सर्वांनी एकमताने आणि एकदिलानं महायुतीला पराभूत करण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीला स्पष्ट केले.
नाना पटोले तरीही नाराजच- सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देण्याचा निर्णय झाला. उत्तर मुंबई काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. नाना पटोले यांना सर्व जागांची नावे जाहीर करण्याची विनंती केली. मात्र नाना पटोले यांचा चेहरा आणि त्यांची देहबोली मात्र याला तयार नव्हती. अखेरीस संजय राऊत यांनीच ही यादी माध्यमांसमोर वाचून दाखवली.
जागा वाटपाचा तिढा सामंजस्याने सुटला- या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्ही एकत्रपणे जागा सांगत आहोत. याचा अर्थ आमचा जागा वाटपाचा तिढा सामंजस्यानं सुटला आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते आग्रही आणि आक्रमक असल्याचं मान्य आहे. मात्र एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वजण एकदिलानं महाविकास आघाडीनं दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देतील," असेही ते म्हणाले.
मी आजपर्यंत अनेक पंतप्रधान जवळून पाहिले आहेत. परंतु अशा पद्धतीची वक्तव्य करणारा पक्षाचा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहतो आहे-माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार
तानाशाही सरकारला संपवण्यासाठी आम्ही एकत्र- विनोद घोसाळकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून प्रचार सुरू केला होता. मात्र ही जागा आता काँग्रेसला सुटल्यानंतर विनोद घोसाळकर हे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, " आम्हाला तानाशाहीचा विरोधात एकत्रितपणे लढायचं आहे. कोण लढतो यापेक्षा जिंकणं महत्त्वाचं आहे. सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांना ईडी कार्यालयात बसवून ठेवण्यात आलं होतं. हे जनता विसरलेली नाही. त्यामुळे अशा तानाशाही सरकारला संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असेही ते म्हणाले.
हे देशाचे नव्हे पक्षाचे पंतप्रधान- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे झालेल्या सभेत बोलताना शिवसेना पक्षावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचे त्यांनी वक्तव्य केले. या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पायावर लोटांगण घातले होते. हे कदाचित ते आता विसरले असतील. परंतु कोणती शिवसेना असली आणि कोणती नकली हे बाहेरच्या माणसांनी येऊन सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला ते चांगले ठाऊक आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे भेकड जनता पार्टी किंवा भाकड जनता पार्टी आहे. हा पक्ष आता खंडणी वसुली करणारा पक्ष झालेला आहे. सगळे भ्रष्ट नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यासाठी मोदी आग्रही असतात," अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
सर्वजण जोमानं कामाला लागले- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "जागावाटपांवर शक्य तितकी चर्चा करण्यात आली. सर्वांना आपल्या पक्षाला जागा हवी असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु एकत्र येऊन लढणं आणि जिंकणं महत्त्वाचे आहे. कशासाठी आणि कोणासाठी लढतो आहे, ते डोळ्यांसमोर ठेवून लढावं आणि जिंकावे लागते. सर्वजण जोमानं कामाला लागले आहेत. भविष्यात प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. महाविकास आघाडीचा कार्यक्रम एकत्रितपणं जाहीर करणार आहोत. मविआ अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
भाजपा हा खंडणीखोर पक्ष- घटक पक्षांनी आम्हाला एकही जागा मागितली नाही. मोदी सरकारचा पराभव महत्त्वाचा आहे. भाजपा हा खंडणीखोर पक्ष आहे. कालचे भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हतं. कालचे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नेत्याचे होते, अशी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चंद्रपूर सभेतील भाषणावरून टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस ही नकली शिवसेनेसोबत असल्याचं विधान केलं होतं.
उद्योगपतींचे साडेसोळा लाख कोटी रुपये माफ- नाना पटोले म्हणाले, "मोदींचा पराभव करणं महत्त्वाचं आहे. तब्येत बरी नसतानाही सोनिया गांधी यांनी लक्ष घातलं. समजूतदारपणा दाखविणं म्हणजे अपमान नाही. काँग्रेसनं जाहीर केलेला जाहीरनामा हा सर्वसमावेशक आहे. त्याच्यापेक्षा राज्या संदर्भातील काही वेगळे मुद्दे असतील तर आम्ही एकत्र बसून त्यात अधिकचा जाहीरनामा जोडणार आहोत. महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी आम्हाला केवळ दोन लाख कोटी रुपये लागणार आहेत. मोदी सरकारनं उद्योगपतींचे साडेसोळा लाख कोटी रुपये माफ केले होते.
असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला
- शिवसेना ठाकरे गट- 21
- काँग्रेस -17
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -10
- काँग्रेस या 17 जागांवर निवडणूक लढविणार- नंदुरबार, धुळे, अकोला अमरावती नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि मुंबई उत्तर
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या 10 जागांवर निवडणूक लढविणार-बारामती, शिरूर, सातारा भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड
- शिवसेना ठाकरे गट या 21 जागांवर निवडणूक लढविणार-जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकणंगले संभाजी नगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशीम मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पछिम मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य
साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त- शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी 35 जागांवर विजय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, " महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शहाणे दिसतात. साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आजचा मुहूर्त निवडला. मोदी आणि शाह यांना राज्यात पाय ठेवू देऊ नका, अशी राज ठाकरे यांची भूमिका होती. वर्षामधील राजकीय बैठकांवरून निवडणूक आयोगानं मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवासह विशेष कार्याधिकाऱ्याला नोटीस पाठविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन चंद्रपूरमधील सभेत बोलताना काँग्रेस ही नकली शिवसेनेबरोबर असल्याचं म्हटलं होतं. त्यावर खासदार राऊत म्हणाले, " मोदींना बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते.
हेही वाचा-