पुणे Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. मागील आठवड्यात महायुतीकडून भाजपाचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर भाजपा नेते संजय काकडे (Sanjay Kakde) हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता काकडेंनीच प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यावेळी त्यांनी 'एकनाथ शिंदेंची शिवसेना सोबत आहे, पण उद्धव ठाकरेंची ताकद जास्त हे सर्वांना माहिती आहे', असा हल्लाबोलही केला.
काय म्हणाले संजय काकडे : यासंदर्भात आज (28 मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय काकडे म्हणाले की, मी उमेदीची दहा वर्ष पक्षाला दिलीl. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारीवर मी नाराज आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छूक आहे आणि माझी नाराजी ही नैसर्गिक असल्याचं संजय काकडे म्हणाले. परंतु मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पूर्वीचा मित्रपक्ष शिवसेना आता भाजपासोबत नाही. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपासोबत आहे. पण उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे, हे सगळ्यांना माहिती असल्याचं मोठं वक्तव्यही यावेळी त्यांनी केलं.
पोस्टमुळे खळबळ : संजय काकडे यांनी बुधवारी (27 मार्च) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. पोस्टमध्ये ते म्हणाले की, पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय-काय कामं केली हे त्यांना सविस्तर सांगितलं. तसंच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली.
पुढं ते म्हणाले, "मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे", संजय काकडे या सगळ्या गोष्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.
हेही वाचा -