रावेर Raver Lok Sabha Election Results : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपानं सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी दिली होती.
रक्षा खडसे यांना लीड : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, रावेर लोकसभा मतदार संघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधल्यात जमा आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजयी घोडदौड केली आहे. त्यामुळं रावेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
रावेर मतदारसंघाचा इतिहास : जळगाव जिल्ह्यात प्रामुख्यानं दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. एक म्हणजे जळगाव आणि दुसरा रावेर लोकसभा मतदारसंघ. फेररचना आयोगाच्या शिफारसीनुसार, 2008 मध्ये रावेर या मतदारसंघाची निर्मिती झालीय. नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या या मतदारसंघात जळगावमधील चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर या पाच तर बुलढाण्यातील मलकापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलाय. मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून म्हणजे 2009 पासून इथं भाजपाचाच खासदार राहिलेला आहे. 2009 मध्ये हरिभाऊ जावळे तर 2014 आणि 2019 मध्ये एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे इथून खासदार होत्या.
2019 मधील राजकीय परिस्थिती : रावेर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये भाजपानं एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. रक्षा खडसेंच्या विरोधात काँग्रेसनं उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. पण एकनाथ खडसेंचा प्रचंड प्रभाव असलेल्या मतदारसंघात त्यांना रक्षा खडसेंचा पराभव करणं शक्य झालं नाही. रक्षा खडसे यांनी निवडणुकीत डॉ. उल्हास पाटील यांचा तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.
रावेर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
वर्ष - 2019 : रक्षा खडसे (विजयी उमेदवार- भाजापा) 59.96% मतं
वर्ष - 2014: रक्षा खडसे (विजयी उमेदवार- भाजपा) 59.99% मतं
वर्ष - 2009: हरिभाऊ म. जावळे (विजयी उमेदवार- भाजपा) 45.67% मतं
हेही वाचा -
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक; नारायण राणेंना मोठी आघाडी - Lok Sabha Election Results 2024
- भाजपा सत्तेत येणार नाही, निकालावर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Maharashtra lok Sabha election
- सांगली लोकसभा निवडणूक निकाल : सांगलीची पाटीलकी कोणाकडे; विशाल, संजय की चंद्रहार? - Sangli Lok Sabha Election Results 2024