मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यातील जागावाटपांत महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील चित्र स्पष्ट झालं असून कुठल्या मतदारसंघांमध्ये कोणाबरोबर कोणाची लढत आहे हे आता समोर आलंय. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अनुक्रमे आपापल्या पक्षात पाडलेल्या फुटी नंतर दोन्ही गट विभागले गेले. अशात या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाची व खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? हे चित्र 4 जूनला निकालानंतर स्पष्ट होणार आहे. या निवनडणुकीत राज्यात 13 लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही गटात थेट लढत होतेय. या लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून या लढतींच्या निकालातून विजयी होणाऱ्या खासदाराच्या संख्येवरुन खरी शिवसेना कोणाची हा फैसला होणार आहे. तसंच राज्यातील दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात थेट मुकाबला होतेय. कोणते आहेत हे मतदारसंघ जाणून घ्या.
एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे यांना जास्त जागा : यंदा जागावाटपाच्या लढाईत उद्धव ठाकरे गटानं एकनाथ शिंदे गटावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. महायुतीत सर्वात जास्त जागा या भाजपाच्या वाटाड्या आल्या असून भाजप 28 जागा लढवत आहे. तर त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट 15 जागा लढवत आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढवत असून 1 जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देण्यात आलीय. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21 जागा लढवत असून त्या खालोखाल काँग्रेस 17 जागा लढवत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा आता पूर्णतः संपला असला तरी खरी शिवसेना कोणाची? व खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? याचा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे लढत असलेल्या 15 जागांपैकी 13 मतदारसंघांमध्ये त्यांचा थेट मुकाबला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आहे. याच कारणानं या 13 मतदारसंघांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून यात होणाऱ्या विजयानंतर खरी शिवसेना कोणाची याचा फैसला मायबाप जनता करणार आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील 13 मतदारसंघातील लढती :
1) बुलढाणा :
प्रताप जाधव - शिंदे गट
नरेंद्र खेडेकर - ठाकरे गट
2) हिंगोली :
बाबुराव कोहलीकर - शिंदे गट
नागेश आष्टीकर - ठाकरे गट
3) यवतमाळ-वाशिम :
राजश्री पाटील - शिंदे गट
संजय देशमुख - ठाकरे गट
4) हातकणंगले :
धैर्यशील माने - शिंदे गट
सत्यजित पाटील - ठाकरे गट
5) छत्रपती संभाजीनगर :
संदिपान भुमरे - शिंदे गट
चंद्रकांत खैरे - ठाकरे गट
6) मावळ :
श्रीरंग बारणे - शिंदे गट
संजोग वाघेरे - ठाकरे गट
7) शिर्डी :
सदाशिव लोखंडे - शिंदे गट
भाऊसाहेब वाकचौरे - ठाकरे गट
8) नाशिक :
हेमंत गोडसे - शिंदे गट
राजाभाऊ वाजे - ठाकरे गट
9) कल्याण :
श्रीकांत शिंदे - शिंदे गट
वैशाली दरेकर - ठाकरे गट
10) ठाणे :
नरेश म्हस्के - शिंदे गट
राजन विचारे - ठाकरे गट
11) दक्षिण मुंबई :
अरविंद सावंत - शिंदे गट
राजान विचारे - ठाकरे गट
12) मुंबई उत्तर-पश्चिम :
रवींद्र वायकर - शिंदे गट
अमोल कीर्तिकर - ठाकरे गट
13) मुंबई दक्षिण-मध्य :
राहुल शेवाळे - शिंदे गट
अनिल देसाई - ठाकरे गट
या 13 लढतींपैकी बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली या तीन मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं असून इतर 10 मतदारसंघात मतदान होणं बाकी आहे.
पवार विरुद्ध पवार लढत : महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधील एकूण 6 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघात दोन्ही शिवसेनेमध्ये थेट लढत होत आहे. त्या कारणानं या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. दुसरीकडं बारामती व शिरुर या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही गट आपापसात भिडत आहेत.
1) बारामती :
सुनेत्रा पवार - अजित पवार गट
सुप्रिया सुळे - शरद पवार गट
2) शिरुर :
शिवाजीराव आढळराव पाटील - अजित पवार गट
अमोल कोल्हे - शरद पवार गट
असली, नकलीचा फैसला 4 जूनला : राज्यभरात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुकाबला होणार असला तरी राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळं उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांच्या गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य खुद्द अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यामुळं या दोन्ही गटांमध्ये होणाऱ्या लढतीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झालंय. याबाबत बोलताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. यात कुठंही दुमत नाही. परंतु सध्या असली व नकली शिवसेना यावरुन हे जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, त्याचा निकाल लवकरच 4 जूनला लागणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेना गट राज्यात 15 जागा लढवत असून या जागा आमच्या हक्काच्या आहेत. यापैकी 13 जागांवर दोन्ही शिवसेनेमध्ये लढत होत असली तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. परंतु, जे नकली शिवसेनेवाले ओरडत आहेत, त्यांची तोंडं 4 जूनच्या निकालानंतर कायमची बंद होतील, असा टोलाही वाघमारे यांनी लगावलाय.
हेही वाचा :