मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं मतदान जसं जवळ येत आहे, तसं प्रचारालादेखील जोर येत आहे. प्रचाराच्या माध्यमातून आपण लोकांसाठी कसं काम करणार आहोत, हे पक्षांकडून आणि उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. प्रचारात नेते, आमदार, खासदार यांच्यासह स्टार प्रचारकही लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्याचबरोबर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात आता सेलिब्रेटिंनासुद्धा उतरवलं जाणार आहे. कारण कलावंत मंडळींची चांगलीच लोकप्रियता असते. त्यांच्या कार्यक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
सेलेब्रिटिंमुळं प्रचाराला मोठी गर्दी : एखाद्या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी राजकीय पक्षांकडून क्रिकेटर्स किंवा सेलेब्रिटीना आणलं जातं. सेलिब्रिटी आल्यामुळं साहजिकच कार्यक्रमाला मोठी गर्दी होते. या हेतूनं कार्यक्रमास सेलिब्रिटी आणले जातात. आता याचाच अवलंब करत राजकीय पक्षांकडून प्रचारात सेलिब्रेटींना उतरुन प्रचाराला मोठी गर्दी खेचण्याची खेळी खेळली जाणार आहे. कारण प्रचारात सेलिब्रिटी आले तर त्यांना पाहण्यासाठी, बघण्यासाठी, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी स्वाभाविकच लोकांची मोठी गर्दी होते. सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मराठीसह हिंदी कलाकारही प्रचारात उतरणार : देशात 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्पाचं मतदान होणार आहे. यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारात उमेदवारांकडून अनेक आमिषं दाखवण्यात येत आहेत. तसंच गर्दी होण्यासाठी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. कलाकार मंडळीत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा प्रचारात सहभागी होताना दिसणार आहेत.
साहेबांच्या आदेशानंतर लवकरच प्रचारात दिसू : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'शिव चित्रपटसेने'कडून आम्ही सर्व कलाकार पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरणार आहोत. गरज भासल्यास अन्य कलाकारांनादेखील पाचारण करण्यात येईल. पण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश येईल तेव्हापासून आम्ही प्रचाराच्या कामाला लागू", असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितलंय.
कुठले कलाकार दिसणार प्रचारात : कलाकारांचा थेट राजकारणांशी संबंध नसतो. अनेक कलाकार हे तटस्थ भूमिका घेतात. मात्र कलाकार विविध चित्रपट आणि नाटक संघटना, संस्थाच्या माध्यमांतून राजकीय पक्षांसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'शिव चित्रपट सेने'त सुशांत शेलार, माधव देवचके, राजेश भोसले, योगेश शिरसाट, शर्मिष्ठा राऊत, हार्दिक जोशी आणि आदिती सारंगधर आदींचा समावेश आहे. तर मराठीतील सुपरस्टार भरत जाधव, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, केदार शिंदे, सुबोध भावे, आदेश बांदेकर, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक आदी अभिनेते प्रचारात उतरताना दिसतील. तसंच प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे, प्रिया बापट, स्पृहा जोशी यांच्यासह आदी अभिनेत्रीदेखील प्रचारात पाहायला मिळणार आहेत.
सुपारी किती लाखांची : निवडणूक रणधुमाळीच्या प्रचारात चित्रपटातील कलाकारांसह छोट्या पडद्यावरील कलाकरदेखील प्रचारात दिसल्यास नवल वाटायला नको. प्रसिद्ध मालिका 'चला हवा येऊ द्या' मधील विनोदवीर कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, श्रेया बुगडे यासह विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, नम्रता संभेराव, ओमकार भोजने आदींचा समावेश असणार आहे. तर दुसरीकडे कलाकारांच्या सुपाऱ्या या लाखांच्या घरात असतात. हिंदी चित्रपटसृष्टील प्रसिद्ध कलाकारांना 15-20 लाख रुपये मिळतात. तर मराठीतील कलाकारांच्या सुपारीचा आकडा 50 हजारांपासून 5 लाखापर्यंत आहे. तरी काही कलाकार मंडळी प्रचारापासून दूर राहणेच पसंत करतात. या कलाकारांविषयी सामान्यांच्या मनात नेहमीच हेवा आणि अप्रूप वाटत आलंय. प्रचारात कलाकारांना पाहण्यासाठी लोकांची नक्कीच गर्दी होताना दिसणार आहे, यात शंका नाही.
हेही वाचा :