नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचारामुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळं आज (17 नोव्हेंबर) विधानसभा निवडणूक प्रचाराचा रविवार 'सुपर संडे' ठरला. कारण या दिवशी अनेक उमेदवारांनी दिग्गज नेते तसंच सेलेब्रिटींना घेऊन प्रचार केला. त्यातच आज सुट्टीचा दिवस असल्यानं घराघरात जाऊन उमेदवारांनी प्रचार केला. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
'या' नेत्यांच्या सभांचा धडाका : पंढरपूर मंगळवेढा येथे खासदार सुप्रिया सुळे यांची सभा पार पडली. तसेच उदगीर मतदारसंघात जळकोट येथे जयंत पाटील यांची जाहीर सभा पार पडली. तर माढा, सोलापूर आणि पुण्यातील इंदापूर येथे शरद पवारांनी जाहीर सभा घेतली. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नंदूरबार, धुळे आणि नाशिकात सभा घेतल्या. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर, इंचलकरंजी आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी सातारा आणि पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या उपस्थितीत गडचिरोली येथे काँग्रेसची विराट सभा पार पडली. यावेळी नाना पटोले तसंच काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत अनेक गावांचा दौरा केला. तसंच प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार तथा अभिनेत्री कंगना राणावत यांचा नागपूरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता.
अमित शहांच्या सभा अचानाक रद्द : विदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या चार सभा होणार होत्या. मात्र, त्यांना अचानक सभा रद्द कराव्या लागल्या आणि दिल्लीला जावं लागलं. मणिपूरमधील परिस्थिती चिघळल्यानं अमित शहांना दिल्लीला यावं लागल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याऐवजी गडचिरोली शहरात आणि वर्ध्यात स्मृती इराणी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सभा पार पडल्या.
शायना एनसी यांच्या प्रचारार्थ मिथुन चक्रवर्थींचा रोड शो : काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रांनी नागपुरात रोड शो केला. काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंच्या प्रचारार्थ प्रियंका गांधींनी रोड शो केला. तर दुसरीकडे, मुंबईत शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवारी शायना एनसी यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्थी यांनी रोड शो केला. तसंच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचारावर भर देण्यात आला. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा 'सुपर संडे' ठरला.
कंगना राणावत यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाही मागं राहिली नाही. भाजपानं तर नेहमी आपल्या वक्तव्यामुळं चर्चेत राहणाऱ्या खासदार कंगना राणावत यांचा मध्य नागपूर, पश्चिम आणि दक्षिण पश्चिम मतदारसंघात भव्य रोड शो आयोजित केला. त्यांना पाहण्यासाठी विशेषतः तरुण तरूणींनी तोबा गर्दी केली होती. दरम्यान, त्यांनी लोकांसोबत संवाद साधला यामुळं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. अभिनेत्री कंगणा रणावत प्रथमच नागपूरला आल्यानं त्या लोकांचं आकर्षण ठरल्या.
हेही वाचा