मुंबई PM Modi Campaign : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत अकरा सभा घ्याव्या लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्रात 11 सभा घेत आहेत. त्यांच्या आणखी काही सभा महाराष्ट्रात पुढील दोन टप्प्यात होणार आहेत. म्हणजे त्यांना महाराष्ट्रात किमान 20 ते 25 सभा घ्याव्या लागणार आहेत. भाजपाचे देशातील प्रमुख नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः महाराष्ट्रात सातत्यानं यावं लागत आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रावर या नेत्यांनी अधिक लक्ष दिलं आहे हे स्पष्ट होतं. नेमकी याची काय कारणं आहेत जाणून घेऊया राजकीय तज्ञांकडून.
पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, रामटेक, आणि वर्धा येथे त्यांनी सभा घेतल्या. तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणीत सभा घेतल्या. तिसऱ्या टप्प्यात मोदी यांनी सोलापूर सातारा, पुणे, माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा घेतल्या. अशा एकूण आतापर्यंत अकरा सभा त्यांनी घेतल्या आहेत. याशिवाय मोदी सहा मे रोजी बीडमध्ये येणार आहेत आणि दहा मे रोजी ते कल्याण आणि दिंडोरी येथे सभा घेण्याची शक्यता आहे.
म्हणून मोदी यांचे दौरे : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे देशात खासदारांची जास्त संख्या असलेलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं या राज्यातून अधिकाधिक खासदार संसदेत यावेत, यासाठी मोदी यांनी प्रयत्न केला तर त्यात काही वावगं नाही. मोदी यांनी देशाचा विकास गेल्या दहा वर्षात केला आहे. त्यामुळं त्यांना मतदारांसमोर जाण्याचा हक्क आहे आणि महाराष्ट्रातील मतदार हे नेहमीच मोदींचे स्वागत करतात. त्यामुळं त्यांनी महाराष्ट्रात येऊन प्रचार दौरे करावेत अशी जनतेचीच अपेक्षा असते.
मोदी यांच्या सभांना देशभरात मागणी : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे राज्य समन्वयक विश्वास पाठक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून मोठा प्रतिसाद आहे. पंतप्रधानांनी केलेल्या विकास कामामुळं देशभरात त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये ही पंतप्रधानांबद्दल आदर आणि प्रेम असल्यामुळं महाराष्ट्रात त्यांनी येऊन सभा घ्याव्यात यासाठी जनतेचीच मागणी असते. जनताच त्यांचं स्वागत करते. आम्हाला उत्तरेत चांगली मते मिळणार आहेत त्या पाठोपाठ आता दक्षिणेतही तुम्हाला कमळ फुललेलं निश्चित दिसेल असा दावा पाठक यांनी केला. तर महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळणार असून पंतप्रधान मोदी यांचा चेहरा हा विकासाचा चेहरा असल्यानं त्यांच्या सभांना अधिक पसंती असल्याचं पाठक यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातल्या नेत्यांवर मोदींचा विश्वास नाही : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना सातत्यानं महाराष्ट्रात यावे लागत आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांवर पंतप्रधानांचा विश्वास नाही. महाराष्ट्रात महायुतीला पराभव पत्करावा लागत असल्याचं चित्र निर्माण झालंय. तसंच आता महाराष्ट्रात महायुतीला जनाधार उरलेला नाही, हे समजल्यामुळंच पंतप्रधानांना सातत्यानं महाराष्ट्रात यावं लागत असल्याचं लोंढे म्हणाले. तसंच उत्तरे प्रमाणे महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरही महाविकास आघाडीला मोठा जनाधार लाभतो आहे. 400 पारचा दिलेला नारा आता पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळं महाराष्ट्रातून काही मदत मिळते का हे चाचपण्याचा मोदी यांचा प्रयत्न दिसतो आहे.
हेही वाचा -
- डमी उमेदवारांमुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं गणित बदलणार, पवार विरुद्ध पवार नावामुळं मतदारांत गोंधळ - LOK SABHA ELECTION 2024
- 'होय मी भटकती आत्मा'; माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी अस्वस्थ होतो - शरद पवार - Sharad Pawar replied Narendra Modi
- मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha