अहिल्यानगर : मी गृहमंत्री झालो तर सत्तेतील साठ सत्तर टक्के नेते कायमचे गुवाहाटीला जावून बसतील. तसेच महायुतीतील भ्रष्टाचारी नेत्यांना सोडणार नसल्याचा इशारा रोहीत पवार यांनी अकोले येथील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अमित भांगरे यांच्या प्रचार सभेत दिला.
कायमचे गुवाहाटीला पाठवणार : प्रचारसभेत रोहीत पवारांनी महायुती सरकार विरोधात तुफान फटकेबाजी केली. गृहमंत्री झालो तर सत्तेतील साठ सत्तर टक्के नेते कायमचे गुवाहाटीला जावून बसतील असं वक्तव्य त्यांनी केलं. आम्ही सेटलमेंट न करणारे लोक आहोत. तेव्हा गृहमंत्री पद चुकून मिळाल तर भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षातील काही लोक महाराष्ट्रात न राहाता कायमचे गुवाहाटीला जावून राहतील असं रोहीत पवारांनी म्हटलं.
महायुतीवर केली टीका : महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात 60 हजार कोटींची भ्रष्टाचार झाला आहे. मात्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना चुकीची माहिती दिली असल्यानं, मोदींनी महायुती ऐवजी महाविकास आघाडी सरकारनं भ्रष्टाचार केल्याचं सांगितलं असाव अशी टीका, रोहित पवार यांनी केली. ते अकोले मतदारसंघात अमित भांगरे यांच्या प्रचारार्थ आले असता, त्यांनी पंतप्रधान मोदींसह महायुतीतील सर्वच पक्षांवर कडाडून टीका केली.
गुजरातशाही खपवून घेणार नाही : 'एक रहोगे तो सेफ रहोगे' हे महायुतीत सामील असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षांसह भाजपात असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल मोदी बोलले असावेत. कारण ते एक राहिले नाहीत तर सुरक्षित राहणार नाहीत असा चिमटा रोहित पवार यांनी मोदींच्या वक्तव्यावर काढला. हा महाराष्ट्र साधू-संतांचा आहे. त्यामुळं धार्मिक तेढ अथवा मराठा-ओबीसी वाद कोणी वाढवू पहात असेल तर राज्यातील जनता द्वेष पसरवणारी गुजरातशाही खपवून घेणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवेल असे रोहित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणावं : शिखर बँक घोटाळ्यात अडकलेले, तसेच विविध अडचणीत आलेले प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आदी सत्तेत गेल्यानं त्यांना दिलासा मिळून त्यांचे बरे चालले असेल. मात्र सर्वसामान्य जनतेचे बरे चाललेले नाही, त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणावं लागेल असं रोहित पवार यांनी सांगितलं.
लोकशाही मार्गाने बदला : आ. किरण लहामते यांच्या भाषणातील खालच्या दर्जाच्या भाषेचा समाचार यावेळी रोहित पवार यांनी घेतला. आ. किरण लहामते हे दिवंगत अशोक भांगरे, जेष्ठ नेते मधुकर पिचड यांच्याबद्दक वाईट भाषेत बोलत आहेत. कार्यकर्त्यांना भिकारी म्हणत आहेत. या परस्थितीत अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांनी लहामते यांचा बदला लोकशाही मार्गाने घेतला पाहिजे, जे काही त्यांना दहा-बारा हजार मते पडणार आहेत ते त्यांनी मविआचे उमेदवार अमित भांगरे यांच्या पाठीशी देऊन त्यांचा लीड वाढवला पाहिजे, अशी विनंती वजा अपेक्षा रोहित पवार यांनी आपल्या भाषणात केली.
टिंगरे निवडून येणार नाहीत : पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील आ. टिंगरे यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवल्याबाबत सुप्रिया सुळे यांच्या माहितीबद्दल प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी टिंगरे हे आता निवडून येणार नाहीत, ते थेट तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहेत. म्हणून त्यांनी काही पत्रे साहेबांना पाठवली असेल. आजच माझी त्या भागात सभा आहे. मी सभेत यावर अधिक भाष्य करेन.
हेही वाचा -