नांदेड : विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारकीची शपथ घेतल्यानंतर हेमंत पाटील यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. हेमंत पाटील मुंबईहून नांदेडला आल्यानंतर रेल्वे स्टेशन ते त्यांच्या घरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. काही दिवसांपूर्वीच हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष स्वतंत्र विभाग कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझं नक्की पुनर्वसन करतील, असा विश्वास हेमंत पाटील यांनी बोलून दाखवला होता.
दिलेला शब्द पाळला : राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी मनापासून आभार मानतो. राजकारणात अनेक आश्वासनं दिली जातात, पण कार्यकर्त्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. लोकसभा निवडणुकीला मला उमेदवारी मिळाली, पण राजकीय कारणास्तव मला माझी खासदारकीच्या लढतीतून माघार घ्यावी लागली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं होतं की, तुझं राजकीय पुनर्वसन मी करतो. एकनाथ शिंदे यांनी मला दिलेला शब्द पाळला," अशा शब्दात हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील : खासदारकीची उमेदवारी कोणामुळं कापली, असं विचारलं असता हेमंत पाटील म्हणाले की, त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आमदार हेमंत पाटील यांना नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलीय. महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मराठवाड्यात महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास जिवंत पाटील यांनी व्यक्त केला.
हेमंत पाटील यांचं पुनर्वसन : 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत हेमंत पाटील यांना हिंगोली येथून शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या मताधिक्याने हेमंत पाटील विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं. पक्षाकडून हिंगोली मतदारसंघासाठी बाबुराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली, पण त्यांचा पराभव झाला होता. आता राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये त्यांना पुन्हा एकदा आमदार बनवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आणि हेमंत पाटील यांचं राजकीय पुनर्वसन केलं.
हेही वाचा