मुंबई Ladki Bahin Yojana : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अभूतपूर्व आणि प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळतोय. या योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यात लाभार्थी महिलांना दोन हप्ते मिळालेत. तर 29 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झालीय. परंतु या योजनेच्या माध्यमातून गैर प्रकारे पैसे खात्यात जमा होण्याचे प्रकार वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गैर पद्धतीने पैसे मिळवले : ऑगस्ट महिन्यात नवी मुंबईत एका व्यक्तीने महिलांच्या नावे 34 अर्ज दाखल करून पैसे खात्यात वळते करून घेतले होते. त्यानंतर आता नांदेडमध्ये एका पुरुषानं महिलांच्या आधार कार्डला पुरुषांचे आधार कार्ड जोडून गैर पद्धतीने पैसे खात्यात वळवून घेतल्याची बाब उघड झालीय. या दोन घटना ताज्या असताना आता काही महिलांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत. तर काही महिलांनी वार्षिक उत्पन्न जास्त असतानाही अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा पद्धतीनं मिळवलेले पैसे महिलांकडून सरकार परत घेणार का? किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या गैरप्रकारामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून, आपल्याला मिळालेले पैसे खरोखरच सरकार परत घेणार का? असा सवालही लाडकी बहिणी उपस्थित करीत आहेत.
सरकार पैसे परत घेणार? : खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, योजनेमुळे राज्यातील गरजू महिलांना याचा चांगला फायदा होत आहे, तर दुसरीकडे यात गैरप्रकारही वाढले आहेत. सोशल मीडियावर काही बातम्या अन् पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमधून असं म्हटलं आहे की, काही महिलांनी चार-चार अर्ज दाखल करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. तर काही महिला सरकारी नोकरीला असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत. काही महिलांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक आहे, जे या योजनेच्या निकषात बसत नाही, अशा महिलांनीही अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे.
महिलांनी पैसे परत करावेत : विशेष म्हणजे ही माहिती सरकारला समजल्यानंतर चुकीच्या पद्धतीने खात्यात वळवलेले पैसे महिलांकडून सरकार परत घेणार आहे. तसेच अशा महिलांनी तहसील कार्यालयात पैसे परत करावे अन्यथा त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचंही सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमधून सांगण्यात आलंय. त्यामुळे अशा महिलांना पैसे परत करावे लागणार का? किंवा सरकार यांचे पैसे परत घेणार का? किंवा त्यांच्यावर खरोखरच पोलीस कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनात येऊ लागले आहेत. पण खरोखरच ज्या महिला गरजू आहेत, त्यांनी या योजनेमुळे आनंद व्यक्त केला आहे. परंतु अशा गैरप्रकारामुळे जर ही योजना बंद झाली, तर त्याचा आम्हाला लाभ घेता येणार नाही, असं म्हणत महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकी कारवाई काय होणार?: दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील वाढत्या गैरप्रकाराबद्दल महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हो ज्यांनी गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा चुकीची माहिती देऊन खात्यात पैसे जमा करून घेतले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जसे की, नांदेडमध्ये एकाने 38 अर्ज दाखल करून पैसे वळते करून घेतले. त्याच्यावर आम्ही कारवाई केली आहे, त्याचे बँकेतील अकाऊंट गोठवले आहे. ज्यांनी गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेतलाय, अशांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे, असं मंत्री अदिती तटकरे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितले. परंतु पैसे तहसील कार्यालयात जमा करा किंवा त्या महिलांवर पोलीस कारवाई होणार असल्याचंही अद्याप सरकारकडून सांगण्यात आलं नसल्याचेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा-