सातारा : विधासनभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यादृष्टीनं सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कडवी लढत असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे सोमवारी (14 ऑक्टोबर) कराडमध्ये महिला महोत्सवाच्या माध्यमातून भव्य शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी ते आपल्या गटाची राजकीय भुमिका जाहीर करतात का, याकडे अवघ्या कराड दक्षिण मतदार संघातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
नगरपालिकेच्या राजकारणात दबदबा : माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराडमध्ये सोमवारी भव्य महिला महोत्सव आयोजित केला आहे. यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून यादव गटाचा कराड नगरपालिकेच्या राजकारणात दबदबा आहे. ग्रामीण भागात देखील तरूणांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे यादव गटाची ताकद यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. अशा स्थितीत महिला महोत्सवात राजेंद्रसिंह यादव कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्र्यांची यादव गटाला ताकद : राजेंद्रसिंह यादव हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांनी कराड शहराच्या विकासासाठी 209 कोटींचा निधी आणला आहे. मुख्यमंत्र्यांनी यादव गटाला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे यादव गटाचं सध्या राजकारणातील वजन वाढलं आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डॉ. ऑल भोसले यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळं यादव गटाची राजकीय भूमिका निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.
हेही वाचा