मुंबई Manohar Joshi Passes Away : माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi Political Role) यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं. मनोहर जोशी यांना विस्मृतीचाही आजार जडला होता. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतरही मनोहर जोशी (Manohar Joshi Political History) हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील त्यांची आढळ निष्ठा त्यांना शिवसेनेपासून दूर करू शकली नाही.
शिवसेनेची स्थित्यंतरं पाहिलेला सैेनिक : महाराष्ट्रात 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' नावाचा आक्रमक पक्ष सुरु केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन मनोहर जोशी 1967 साली 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट'चे प्रिन्सिपल मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दादर विभागातून मनोहर जोशी यांनी विधानसभेत नेतृत्व केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि सल्लागार म्हणून मनोहर जोशी यांच्याकडं पाहिलं जातं. शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांच्या शब्दाला मान आणि आदर मिळाला. शिवसेनेचे 'चाणक्य' अशी त्यांची ओळख कायम राहिली.
1995 मध्ये मुख्यमंत्री : राज्यात शिवसेना-भाजपा युतीची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री पदासाठी कोण अशी चर्चा सुरू झाली होती. वास्तविक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख मुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेतात अशी प्रथा असताना, कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी शपथ घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेसचा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. मात्र, असे असले तरी शपथविधीच्या आदल्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी उठ म्हटल्यानंतर उठणारा आणि बस म्हटल्यानंतर बसणारा असायला हवा. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच राहणार" हे आपल्या 'ठाकरी' शैलीत स्पष्ट केलं होतं.
'या' कारणामुळं जोशी यांचं मुख्यमंत्रिपद गेलं? : बाळासाहेब ठाकरे यांनी "काहीही प्रश्न न विचारता राजीनामा द्या" असं एक पत्र मनोहर जोशी यांना लिहिलं होतं. त्यानंतर लगेच मनोहर जोशी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, जोशी यांच्या एकूणच मुख्यमंत्रिपदाला फटका हा त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळं बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मनोहर जोशी यांचे जावई बांधकाम व्यावसायिक गिरीश व्यास यांना जोशी मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये आंदण दिलेला पुण्यातील प्रभात रोडवरील कथित 30 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट व त्यावरील अकरा मजली बांधकाम बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ही जागा महापालिकेनं ताब्यात घ्यावी, अन्यथा इमारत पाडावी असा आदेशही न्यायालयानं त्यावेळी दिला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 8 ऑगस्ट 1999 रोजी याचिका दाखल केली होती. पालिका शाळेसाठी आरक्षित जागेवर व्यास यांनी नियम धाब्यावर बसवून 22 फ्लॅटची इमारत बांधली व नंतर आरक्षण बदलून घेतलं, असा आरोप होता.
मुख्यमंत्री पदावरून पायउतार : मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगली कारकीर्द महाराष्ट्रात केली. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि भाजपासोबत जुळवून घेत बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभाळत त्यांनी चार वर्ष कारभार केला. मात्र, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही मतभेद झाले. ते मनोहर जोशी यांना भोवले. शिवसेनेच्या खासदारांना एकत्र बांधून ठेवण्यात आणि पक्षासाठी योगदान देण्यात नेहमीच मार्गदर्शन मनोहर जोशी यांनी केलं. मनोहर जोशी यांच्या काळात देदीप्यमान कामगिरी जरी झाली नसली तरी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या अजेंड्यानुसार त्यांच्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडली.
लोकसभा अध्यक्ष होण्याचा मराठी माणसाला मान : दादासाहेब मावळंकर यांच्यानंतर पहिला मराठी लोकसभा अध्यक्ष होण्याचा मानही मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच मनोहर जोशी यांच्यावर विश्वास टाकला. जोशी यांनीही आपल्या चोख कामगिरीनं तो सार्थ ठरवला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष होते. सर या बिरुदाला जागत मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम पद्धतीने निभावली. आजही लोकसभेत शिस्तबद्ध कामकाज घडवून आणणाऱ्या देशाच्या 'सर्वोत्तम पाच' लोकसभा अध्यक्षांमध्ये मनोहर जोशी यांचं नाव आदराने घेतलं जातं.
उद्धव ठाकरेंकडून अपमान तरीही शिवसेनेतच : उतरत्या वयानुसार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मनोहर जोशी यांच्याशी संबंध मधुर उरलेन नाहीत. जोशी यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळं उद्धव ठाकरे हे नाराज झाले, अशी चर्चा होती. त्यांनी जोशी यांना दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनोहर जोशी शिवसेनेच्या कार्यक्रमांमधून, व्यासपीठांवरून गायब झाले. मात्र, इतके झाले असतानाही त्यांनी शिवसेना सोडली नाही. इतकंच काय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी आपण जोशी सरांचा आशीर्वाद घेण्यासाठी 'अनौपचारिक' भेट घेतल्याचा दावा केला होता. पण राजकीय विश्लेषकांच्या मते जोशी यांना आपल्या बाजूने वळवण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न होता. मात्र मनोहर जोशी यांनी शिवसेना ठाकरे गटातच राहणं पसंत केलं. एकूणच बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यातील अतूट प्रेमामुळेच ते शिवसेनेत राहिले.
हेही वाचा - राजकारणातील 'कोहिनूर' हरपला; मनोहर जोशी यांचं मुंबईत निधन