मुंबई Extortion Case Against Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (MNS Thane President Avinash Jadhav) आणि वैभव ठक्कर या दोघांविरोधात लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार सराफानं पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आपल्या तक्रारीत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात भादंवी कलम 385, 143, 147, 323, 120 ब अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तक्रारीनुसार, शैलेश जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं. यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि सहा ते सात जणांसह पोलिसांसमक्ष जैन यांचा मुलगा स्वामिल याला मारहाण केली. तसंच अविनाश जाधव यांनी तक्रारदार शैलेश जैन यांना उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन त्यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.
पुढील तपास सुरू : अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिलाय. तसंच याप्रकरणी क्रॉस केस घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय.
सूड भावनेतून गुन्हा दाखल केला : या प्रकरणी अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, "एका व्यक्तीनं दूरध्वनी करुन मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवलंय, असं सांगितलं होतं. त्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला."
हेही वाचा -