मुंबई PM Narendra Modi : देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असं, डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी कधीच म्हटलं नाही. डॉ. सिंग यांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेलं विधान असत्य आहे. डॉ. सिंग यांच्या विधानातील एक वाक्य घेऊन नरेंद्र मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लिम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा हा डाव आहे. परंतु, जनता नरेंद्र मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असं काँग्रेस नेते, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर (DR Bhalchandra Mungekar) यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. मुणगेकर यांनी नरेंद्र मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
बैठकीला नरेंद्र मोदी हजर : “काँग्रेस सत्तेवर आली तर देशाच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला अधिकार असून, जास्त मुले असलेल्या मुस्लिम समाजाला संपत्ती वाटतील हे तुम्हाला मान्य आहे का?" अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या मुद्द्यावर बोलताना डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, "राष्ट्रीय विकास मंडळाच्या ९ डिसेंबर २००६ च्या बैठकीत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग असं म्हणाले होते की, 'देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, मुले यांना विकासाची फळे चाखता आली पाहिजेत. तसेच अल्पसंख्याक समाजाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे.' डॉ. सिंग यांच्या वक्तव्याचा अर्थ, एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक या सर्व समाज घटकांचा पहिला अधिकार आहे, असा होता. तसेच या बैठकीनंतर अहलुवालिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. अल्पसंख्याक याचा अर्थ केवळ धार्मिक अल्पसंख्याक एवढाच नाही तर भाषिक अल्पसंख्याक असाही होतो. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री होते, त्यात नरेंद्र मोदी हे तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित होते."
सर्वांना मान्य होईल अशी आचारसंहिता : मुणगेकर पुढे म्हणाले की, "मुस्लिम समाज आणि काँग्रेसबाबत असं चुकीचं विधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीला असं विधान करणं शोभत नाही. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १०२ जागांचं मतदान झालं असून भाजपाचा पराभव होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. या कारणानं मोदी ४०० पारचा टप्पा गाठू शकत नाहीत. त्यामुळं नरेंद्र मोदी निराश झालेले दिसतात. त्याचप्रमाणं समान नागरी कायदा हा आधीपासूनचा भाजपाचा अजेंडा आहे. असं असताना सर्वांना मान्य होईल अशी आचारसंहिता भाजपा आजपर्यंत का बनवू शकली नाही?" असा प्रश्नही मुणगेकर यांनी उपस्थित केलाय.
जनतेचा भाजपावर विश्वास राहिलेला नाही : "समान नागरी कायद्याच्या बाबतीतही भाजपा जनतेत संभ्रम निर्माण करत आहे. मुस्लिम समाजाला समान नागरी कायदा हा मान्य नाही, असं चित्र सातत्यानं भाजपाकडून निर्माण केलं जातंय. भाजपाचे नेते त्यांच्या संकल्प पत्रावर बोलत नाहीत. त्यामुळं आता जनतेचा भाजपावर विश्वास राहिलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीतील आश्वासनांना त्यांनी ‘चुनावी जुमला’ सांगून जनतेला फसवलं आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान हे भाजपाला मान्य नाही म्हणून भाजपा नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. वाजपेयी सरकार असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला होता. भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे आणि पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही देशाला नवीन संविधानाची गरज आहे, असं जाहीरपणं सांगितलं होतं. आता संविधान बदलणार नाही असं नरेंद्र मोदी सातत्यानं सांगत असले तरी, त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही," असंही मुणगेकर म्हणाले.
हेही वाचा -
- सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे 'व्हू ईज धंगेकर' लोकसभेत काय करणार? 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत - Ravindra Dhangekar Interview
- राज ठाकरेंच्या इंजिनचा 'भोंगा' महायुतीसाठी फायद्याचा? जाणून घ्या इतिहास - Raj Thackeray
- 'तुमचं नमो नमो चालते, पण जय भवानी नाही'; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले 'तुमचं हिंदुत्व नकली' - Sanjay Raut Attack On Pm Modi