मुंबई Dilip Walse Patil Accident : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil Accident) यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. घरात पाय घसरुन ते पडले आणि त्यांना दुखापत झाली. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्सवर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाले आहेत दिलीप वळसे पाटील? : 'काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळं मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन', असं दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
बारामती, मावळ आणि शिरुर मतदारसंघाची जबाबदारी : लोकसभा निवडणूक तोंडावर असून अद्याप महायुतीचे सर्व उमेदवार जाहीर झालेले नाहीत. तसंच बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण अशा चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार देण्यात येणार असून या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी वळसे पाटील यांच्यावर आहे. परंतू असं असतानाच आता वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. त्यामुळं वळसे पाटलांना आता घरातूनच सुत्र हालवावी लागण्याची शक्यता आहे. तसंच डॉक्टर वळसे पाटील यांना किती दिवस आरामाचा सल्ला देतात?, लोकसभा निवडणुकीवेळी वळसे पाटील मैदानात उतरुन आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करु शकणार की नाही?, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचा -
- तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आदेशानुसार वकील म्हणून नियुक्ती, किशोर भालेरावांना न्यायालयाचा दिलासा
- दिलीप वळसे पाटलांच्या सभेत 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा; वळसे पाटील म्हणाले...
- Gram Panchayat Election : दिलीप वळसे पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था, गावात सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विजयी