नागपूर Devendra Fadnavis On MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (9 मार्च) 18 वा वर्धापनदिन असून या वर्धापनदिनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडत आहे. तर यावेळी आपल्या भाषणादरम्यान 'सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय, मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत', असा इरादा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केला आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मनसेची मराठी माणूस आणि हिंदूत्वाची भूमिका ही भाजपासारखीच असल्याचंही ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यासंदर्भात आज नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्यापासून विसंगत नाही. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यचं आहे. मराठी माणसांचे सर्व अधिकार प्रोटेक्ट केलंच पाहिजे, पण त्याचबरोबर एक व्यापक भूमिकाही असली पाहिजे मराठी माणसांच्या हक्कासोबत आज जी हिंदुत्वाची भूमिका मनसेनं घेतली आहे. त्यामुळं त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही. बाकी निवडणुकीत काय करायचंय काय नाही याचे निर्णय चर्चेनंतरच घेतले जातात."
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे : देवेंद्र फडणवीस यांनी आज वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "कंत्राटी कामगारांविषयी सरकारचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आहे आणि राहील. वीज मंडळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आज चर्चा झाली. त्यांचे काही प्रश्न महत्वाचे असून त्याविषयी देखील आम्ही सकारात्मक आहोत. तसंच कंत्राटी कामगारांबद्दल शासनाचा अप्रोच हा संवेदनशीलतेचा असेल", असंही त्यांनी सांगितलं.
जागावाटपाचं काम 80 टक्के पूर्ण : पुढं महायुतीच्या जागावाटपासंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "काल दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली. एका बैठकीत सर्व निर्णय होतील अशी परिस्थिती नाही. मात्र, मी हे नक्की सांगू शकतो की कालच्या बैठकीत 80% पर्यंतचं काम पूर्ण झालंय. तर उरलेलं वीस टक्के काम लवकरच पूर्ण होईल."
हेही वाचा -